कोरोना व्हायरसच्या सावटातही ताजिकिस्तानमध्ये प्रेक्षकाविना फुटबॉल सामन्याचे आयोजन
वृत्तसंस्था/ दुशान्बे, ताजिकिस्तान
कोरोना व्हायरसच्या धास्तीने जगभरातील सर्व फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत किंवा रद्द तरी करण्यात आल्या आहेत. मात्र ताजिकिस्तानने प्रेक्षकाशिवाय सामना खेळवण्याचा निर्णय घेत शनिवारी स्थानिक फुटबॉल मोसम सुरू केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटातही प्रत्यक्ष मैदानावर खेळ झाल्याचे पहावयास मिळाले.
सुपर कप लीगमधील प्रेक्षकाशिवाय खेळविण्यात आलेल्या या सामन्यात बलाढय़ एफसी इस्तिकलोलने पिछाडीवर पडूनही एफसी खुजान्दचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करीत सुपर कप पटकावला. दुसऱया मिनिटला संजर खिसिबोएव्हने खुजान्दला आघाडी मिळवून दिली. मनुचेहर जलिलोव्हने इस्तिकलोलला 78 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोनच मिनिटांनी मुहम्मदजान रखिमोव्हने इस्तिकलोलचा विजयी गोल नोंदवला. त्याचे हे सलग तिसरे एकूण नववे जेतेपद आहे. कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून त्याने आतापर्यंत 60,000 हून अधिक बळी घेतले आहेत. मात्र 90 लाख लोकसंख्या असलेल्या या मध्य आशियाई देशात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप मिळालेला नाही. गेल्या महिन्यात नौरोज वसंतोत्सव देशभरात हजारो लोकांनी मोठय़ा जल्लोषात साजरा केला. जगभरातील नेते सोशल डिस्टन्सिंग अमलात आणण्याचा प्रचार व प्रसार करीत असताना त्यांचे नेते इमोमाली रखमोन पारंपरिक पेहराव परिधान करून तरुणींच्या गराडय़ात जल्लोष करताना दिसत होते.
कोरोना महामारीच्या सावटामुळे जगभरातील बहुतेक सर्व लीग फुटबॉल स्पर्धा प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या आरोग्याच्या विचार करून थांबविण्यात आल्या आहेत. यापैकी अनेकांनी फुटबॉल सामने पुन्हा केव्हा सुरू होणार, याबाबत कोणतेही भाष्य पेलेले नाही. गेल्या महिन्यात कोरोनाचा गदारोळ सुरू असतानाही बेलारुस या युरोपमधील देशाने लीग खेळविण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत त्यांनी सामनाही खेळविला. त्यामुळे तो सामना सर्वांत लक्षवेधी ठरला होता. ताजिकिस्तानमधील सुपर कप सामन्याबाबत मात्र सोशल मीडियावर अशी उत्सुकता दिसून आली नाही. तरीही फुटबॉलपासून वंचित राहिलेल्या जर्मन, इंग्लिश, स्पॅनिश शौकिनांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करीत चांगला प्रतिसाद दिला.
इस्तिकलोल या क्लबची स्थापना रखमोन यांचा मुलगा रुस्तम इमोमाली यांनी केली असून ते सध्या दुशान्बेचे महापौरही आहेत. इस्तिकलोल हा बलाढय़ संघ मानला जातो. पण या सामन्यात पिछाडीवर पडल्यामुळे त्यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सामन्यांवर त्यांचेच वर्चस्व होते. या वर्चस्वाचे त्यांनी नंतर गोलात रूपांतर करून खुजान्दशी आधी बरोबरी साधली व नंतर दुसरा गोल नोंदवून विजयही साकार केला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंनी एकमेकांना आलिंगन दिले आणि हस्तांदोलनही केले. इस्तिकलोलच्या खेळाडूंनी पदके स्वीकारल्यानंतर सुपर कप ट्रॉफीसह प्रचंड जल्लोषही केला. सोविएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर अनेक देश स्वतंत्र झाले. त्यापैकी ताजिकिस्तान व तुर्कमेनिस्तान या दोनच देशात कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. तुर्कमेनिस्तानने मात्र आपल्या देशातील सर्व फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकलेल्या आहेत.