क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोल मशीन इगोर अँगुलोने केलेल्या एकमेव गोलाच्या बळावर एफसी गोवाने ओडिशा एफसीचा पराभव करून आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत आपल्या दुसऱया विजयाची नोंद केली. बांबोळी जीएमसी स्टेडियमवर काल हा सामना खेळविण्यात आला. या विजयाने एफसी गोवाला तीन गुण मिळाले. त्यांचे आता पाच सामन्यांतून 8 तर ओडिशा एफसीचे पाच सामन्यांतून फक्त एक गुण झाला आहे.
एफसी गोवाच्या इगोर अँगुलोचा स्पर्धेतील हा सहावा गोल होता. आता सर्वाधिक गोल त्याच्या नावावर आहेत. एफसी गोवाचा मीडफिल्डर जॉर्गे ऑर्तिज मेंडोंझाला सामनावीर पुरस्कार मिळाला आणि रोख 50,000 प्राप्त झाले. एफसी गोवाचा संघ आता चौथ्या तर ओडिशा एफसी दहाव्या स्थानावर आहे.
पहिल्या सत्रातील ओडिशा एफसीची एकमेव धोकादायक चाल वगळता एफसी गोवाचे वर्चस्व होते. मिळालेल्या अर्ध्या संधींचे रूपांतर करण्यात एफसी गोवाचे खेळाडू यशस्वी झाले असते तर किमान तीन गोलांनी त्यांना आघाडी मिळाली असती. 15व्या मिनिटाला जॉर्ज ऑर्तिझने दिलेल्या क्रॉसवर अँगुलोचा बॅक हेडर सरळ ओडिशा एफसीचा अर्शदीप सिंगच्या हातात गेला.
एफसी गोवाची आक्रमणांची मालिका नंतरही चालूच राहिली. प्रथम 17व्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडिसच्या पासवर जॉर्गे ऑर्तिजचा फटका दिशाहीन ठरला. 34व्या मिनिटाला पहिल्या सत्रातील पहिली धोकादायक चाल ओडिशाने 34व्या मिनिटाला रचली. यावेळी ओन्वूने दिलेल्या पासवर डायगो मॉरीसियोचा गोल करण्याचा यत्न बचावपटू सॅरिटोन फर्नांडिसच्या तत्परतेमुळे वाया गेला.
त्यानंतर दोनच मिनिटांनी ओडिशाच्या स्टिव्हन टेलर आणि शुभम सारंगीने केलेल्या भक्कम बचावामुळे जॉर्गे ऑर्तिजची गोल करण्याची संधी गेली होती.
मध्यंतराला तीन मिनिटे शिल्लक असताना एफसी गोवाच्या लॅनी रॉड्रिग्सने ब्रँडनच्या पासवर गोल करण्याची संधी दिशाहीन फटका मारून घालविल्यानंतर पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेत इगोर अँगुलोने प्रेक्षणीय गोल करून एफसी गोवाला आघाडीवर नेले.
जेसूराज आलेक्सझांडरने डाव्या बगलेतून रचलेल्या चालीवर डी कक्षेत इगोरला चेंडू दिला. इगोरने चेंडूवर ताबा मिळवित प्रथम एका बचावपटूला कट केले आणि नंतर अर्शदीपच्या डाव्या बाजूने चेंडूला प्लेस करीत चेंडूला जाळीत टाकले. इगोरने आपल्या पाचव्या सामन्यात सहावा गोल केला.
दुसऱया सत्रातही एफसी गोवाच्या अनेक संधी वाया गेल्या. प्रथम सॅरिटोन फर्नांडिसने दिलेल्या पासवर जॉर्गे गोल करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर 74व्या मिनिटाला प्रिन्सटन रिबेलोच्या पासवर इगोरचा गोल करण्याचा यत्न बचावपटू गौरव बोराने उधळून लावला. त्यापूर्वी ओडिशाच्या कोल आलेक्सझांडर आणि जॅरी मावीहमिंगथांगाचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले होते. सामन्याच्या शेवटच्या क्षणाला जॉर्गे ऑर्तिजचा लांब पल्ल्यावरून हाणलेला फटका अर्शदीप सिंगने आपल्या डाव्या बाजूने झेपावत चेंडू बाहेर टाकल्याने एफसी गोवाचा संभाव्य दुसरा गोल हुकला.