कांदोळीः एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन हॉस्पिटलमधील डॉक्टर्सना संरक्षणात्मक उपकरणे देताना.
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
कोवीड 19 महामारीशी प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आता गोव्याच्या प्रसिद्ध फुटबॉल क्लब एफसी गोवाने शासनाला साहाय्य करण्याचे ठरविले आहे. या महामारीचा पादुर्भाव टाळण्यासाठी एफसी गोवाने आता कित्येक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून डॅल्टा कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कपाडिया यांनी कचरा व्यवस्थापन आणि विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो आणि एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांच्या समवेत कळंगूट, कांदोळी आणि म्हापसा येथील काही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सिसना वैद्यकीय चाचणी कीट्स आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे दिली.
या विभागात असलेल्या काही लहान हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स यानांही कोरोना महामारीचा पादुर्भाव राखण्यासाठी वैद्यकीय चाचणी कीट्स आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांची नितांत गरज आहे. एफसी गोवा आणि डॅल्टिन ग्रुप नागरी कर्तव्याच्या दृष्टीने आपली जबाबदारी काही प्रमाणात पार पाडत आहे. वैद्यकीय चाचणी कीट्स आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे नसलेल्या हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्सची आम्ही सध्या पाहणी करत आहोत. जोपर्यंत त्यांना ही कीट्स आणि उपकरणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याना ती देणार आहोत, असे एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन म्हणाले. कोरोनाचा हा पादुर्भाव टाळण्यासाठी लोकांना शासनाच्या नियमावली पाळावी आणि आपल्या घरी सुरक्षित राहावे, असे टंडन यांनी म्हटलं आहे.