क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात पहिल्या उपान्त्य फेरीतील पहिल्या लढतीत एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. आज शुक्रवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर हा सामना होईल. या सामन्यात मुंबई सिटीसाठी अमेय रानवडे निलंबनामुळे खेळू शकणार नाही, मात्र स्टार खेळाडू हय़ुगो बुमूस चार सामन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन करेल.
आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक सातत्य राखलेला संघ म्हणून एफसी गोवाचा उल्लेख केला जातो. विक्रमी सहाव्या वेळी या संघाने बाद फेरी गाठली आहे, पण अदय़ाप एकदाही त्यांना जेतेपद मिळविता आलेले नाही. अंतिम फेरीत दोन वेळा धडक मारलेल्या एफसी गोवाला पराभूत व्हावे लागले आहे. आता या संघाचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न साकारण्याचे ध्येय आहे. त्यासाठी लीगमध्ये अव्वल स्थानाची शील्ड मिळविलेल्या मुंबई सिटीला शह दिल्यास त्यांचे यासाठी एक पाऊल पुढे पडलेले असेल.
एफसी गोवाने सलग चौथ्यांदा बाद फेरीत धडक मारली आहे. यावेळी त्यांचा जेतेपदाचा विश्वास असेल. हा संघ आक्रमक खेळ करणाऱया संघांमध्ये अग्रभागी आहे. सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत मुंबईनंतर नॉर्थईस्ट युनायटेडच्या साथीत त्यांचा संयुक्त दुसरा क्रमांक आहे. फॉर्म ही एफसी गोवा संघाची जमेची बाजू आहे. गेल्या 13 सामन्यांत हा संघ अपराजित आहे. अशी कामगिरी हिरो आयएसएलच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाला जमलेली नाही, पण मुंबई सिटीच्या आव्हानाला सामोरे जाणे सोपे नसेल. आपला संघ शैलीशी ठाम राहून खेळेल अशी आशा एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांना आहे.