सोलापूर / प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदार संघासाठी सर्वसामान्य शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारे, अडीअडचणी सोडवणाऱ्या धर्मनिरपेक्ष उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा दिल्याची माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली.
आज शुक्रवारी पासपोर्ट कार्यालया समोरील एमआयएमच्या सोलापूर शहर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकृत एमआयएमच्या वतीने दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा दिल्याचे पत्र महाराष्ट्र शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांना देण्यात आले. यावेळी नगरसेविका वहिदा भंडाले, नगरसेवक गाजी जहागिरदार, एमआयएमचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाब्दि म्हणाले, नगरसेवक तोफिक शेख यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना दिलेला पाठिंबा हा एमआयएमचा नसून खाजगी आहे, माझ्या वतीने देण्यात आलेला हा अधिकृत पाठिंबा अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना दिले आहे. पदवीधरसाठी मतदारांना जो उमेदवार योग्य वाटेल, त्याला एमआयएमच्या मतदारांनी मतदान करावे असेही शाब्दी यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिकेच्या सर्व जागा लढवणार
सोलापूरच्या महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्ष सर्व जागा लढवणार असून यासाठी पक्षाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीत एमआयएम चमत्कार करून दाखवेल.