नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजली जात आहे. उत्तर प्रदेशात भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे. तर आजच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळचा नारा देत, एमआयएम सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता एमआयएमने देखील आगामी काळातील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
आगामी काळातील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पक्षाकडून उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी आघाडी केली आहे, अन्य कुणाशी नाही, असं ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लमीन (एमआयएम) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबसोडून उत्तर प्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नसल्याचे मायावतींनी आज ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.