प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेचे उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांना ‘एमआयएम’ पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्त्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी महापौर कार्यालयाजवळ घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या माजी नगरसेवकांसह मनपा अधिकाऱयांनी संबंधिताला बेदम चोप दिला. दरम्यान, याप्रकरणी एमआयएम पक्षाच्या सुमारे नऊ जणाविरोधी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरेरावी आणि मारहाणीचे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, अस इशारा अधिकाऱयांसह कर्मचाऱयांनी दिला आहे.
थेट अभियंत्याच्या अंगावरच हात
याप्रकरणी महापालिका व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित जवाहरलाल नेहरु घरकुल योजनेतंर्गत सदर बझार येथील सुजीत माने यांना अद्याप घरकुल मिळाले नव्हते. यासंदर्भात शेख आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यासाठी आला होता. येथे घाटगे दिसले. त्याने घरकुलासंदर्भात विचारणा केली. आयुक्तांना भेटण्यास निघालो आहे. तुम्ही उद्या भेटा, असे घाटगे यांनी सांगितले. शेख याने उद्धट वर्तन करत घाटगे यांना मारहाण केली. शेखला अडविणाऱया कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ यांनाही धक्काबुक्की केली.
पदाधिकाऱयांसह अधिकारी संतप्त
यावेळी महापौर कार्यालयात असणारे माजी नगरसेवक राजेश लाटकर आणि अशपाक आजरेकर यांनी शेख याला रोखण्याचा प्रयत्न केला. शेख याने आजरेकर यांनाही अरेरावी केली. आजरेकर यांच्यासह तिथे उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनीही शेख याला मारहाण केली. त्याला महापालिका चौकात आणण्यात आले. त्याचे अन्य साथीदार पसार झाले. उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.यावेळी उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसेवक ईश्वर परमार, माजी महापौर सागर चव्हाण आदींसह पदाधिकारी अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी महापालिकेत येवून पंचनामा केला. सायंकाळी घाटगे यांना पोलीस संरक्षणात त्यांच्या घरी सोडण्यात आले. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून शेख याच्याकडून विविध प्रश्नांवरुन अधिकारी व कर्मचारयांना अधिकाऱयांना धमकावणे, अरेरावी करणे असे प्रकार सुरू होते, असे महापालिकेतील अधिकाऱयांनी सांगितले.
महापालिकेत अधिकाऱयांची हुकुमशाही
लाभार्थी माने गेल्या 12 वर्षांपासून घरकुल मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत महापालिकेत पाठपुरावा सुरु होता. अधिकाऱयांकडूनच उद्धट भाषा वापरली जात होती. त्यांची हुकुमशाही सुरु असल्याचा आरोप ‘एमआयएम’चा प्रवक्ता शाहीद शेख याने केला.
मारहाणीचे प्रकार खपवून घेणार नाही ः सरनोबत
अतिरिक्त कामामुळे काही कामे होण्यास विलंब लागतो. येथून पुढेही मारहाणीचे
प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
अधिकारी, कर्मचाऱयांकडून काम बंद
मारहाणीच्या प्रकारानंतर महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी महापालिका चौकात दाखल झाले. यांनतर सर्वांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.यानंतर सर्वजण लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घाटगे यांच्यासोबत शेख याच्याविरोधात फिर्याद देण्यासाठी गेले.
नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी उपशहर अभियंता हर्षजीत दिलीपसिंह घाटगे व कनिष्ठ अभियंता चेतन बळीराम आरमाळ यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ‘एमआयएम’ पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता शाहिद शाहजहॉन शेख (रा. कोल्हापूर), सुजित सतीश माने (रा. विचारे माळ, कोल्हापूर), सुहेल जावेद बागवान (रा. सोमवार पेठ, कोल्हापूर), इम्रान शेख, प्रविण वाघमारे, तौफिक मुल्ला (याचे पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अन्य अनोळखी 2 ते 3 जणांविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वाविरोधी सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱयांना धमकावून त्यांना मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.