प्रतिनिधी/ धारबांदोडा
उसगाव येथील एमआरएफ कंपनीमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंपनीमध्ये सरकातर्फे ऍन्टिजन चचणी घेण्यात येईल. तसेच कंपनीला स्वखर्चाने एखादे कोरोना निगा केंद्र सुरु करण्याचे आदेश देण्यात येतील असे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले.
कोरोनासंबंधी धारबांदोडा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत वीजमंत्री निलेश काब्राल बोलत होते. मंत्री काब्राल व स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर धारबांदोडा तालुक्याची जबाबदार सोपवण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन व स्थानिक पंचायत मंडळांचा परस्पर संवाद व योग्य सहकार्य आवश्यक आहे. गटविकास कार्यालयातर्फे प्रत्येक सरपंचाला त्याच्या पंचायत क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती वेळोवेळी पुरविणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सरपंच व पंचसदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मंत्री काब्राल म्हणाले. प्रशासकीय कार्यालयांचा पंचायतींकडे योग्य समन्वय नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. नियमभंग करणाऱया अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
सध्या धारबांदोडा तालुक्यात 35 कोरोना रुग्ण असून 4 ते 10 ऑगस्ट दरम्यान 24 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याच कालावधीत 98 जणांच्या स्वॅब चाचण्या घेण्यात आल्याचे डॉ. विल्सन फर्नांडिस यांनी सांगितले. धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील भूमिका नगर, पणसुले, पिळये या भागात एमआरएफ कंपनीच्या कामगारांमुळे ही संख्या वाढली आहे. त्यावर सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे. कंपनी कामगारांचे स्वॅब टेस्टिंग सरकारच्या आरोग्य केंद्रातून न होता खासगी रुग्णालयात केले जाते. याकडे लक्ष वेधण्याची मागणी मंत्री पाऊसकर यांनी मंत्री काब्राल यांना केली. सर्वानी पुढाकार घेऊन काम केल्यास कोरोनाचा प्रसार आटोक्यात येऊ शकतो. सध्या धारबांदोडा तालुक्यातील परिस्थिती चांगली आहे. जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सुधारत असून हा आकडा शुन्यावर आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भूमिकानगर व प्रतापनगर येथे दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे येथे संसर्ग पसरण्याच्या जास्त धोका आहे. त्यामुळे या भागात अधिक लक्ष घातले पाहिजे. ज्या कामगारांचे स्वॅब नमुने घेतले जातात, त्यांना अहवाल मिळेपर्यंत कंपनीने कामावर रुजू करुन घेऊ नये, असे आदेश सरकराकडून एमआरएफ कंपनीला काढण्याची मागणी पंचसदस्य विनायक गावस यंनी केली. मनिष लांबोर, जितेंद्र नाईक, सुशांत भगत, शशिकांत गावकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
कुळे पोलिसांनी सार्वजनिक मास्क न वापरणाऱया 61 लोकांना, फोंडा पोलिसांनी 37 जणांना तर कुडचडे पोलिसांनी 18 जणांना दंड ठोठावल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीला पिळये आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. विल्सन फर्नांडिस, गटविकास अधिकारी मिलिंद्र वेळीप, कुडचडे आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सैरंद्री पारकर, कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजय धुर, कुडचडेच्या उपनिरीक्षक करिष्मा प्रभू, सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, पंचायत सचिव अमोल तेंडुलकर, विजय नाईक, खुशालदास गावकर, संजीव नाईक, कुळेचे सरपंच मनिष लांबोर, मोलेचे उपसरपंच सुशांत भगत, साकोर्डाचे सरपंच जितेंद्र नाईक, दाभाळचे उपसरपंच शशिकांत गावकर, पंचसदस्य रमाकांत गावकर, माजी सरपंच कालिदास गावकर, धारबांदोडाचे पंचसदस्य विनायक गावस, यशवंत बांदोडकर आदी उपस्थित होते.