मध्यप्रदेश, केरळ, दिल्ली संघाला धुळ चारून 42 गुणांसह तिसऱ्या स्थानावर
कोल्हापूर / प्रतिनिधी
गुडगाव (दिल्ली) येथे झालेल्या राष्ट्रीय 12 वर्षाखालील मुलांच्या एमएलबी कप इंडिया साखळी बेसबॉल स्पर्धेत कोल्हापुरातील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल कोल्हापूर ब्रेव्ह संघाने तिसरा (सेकंड रनरअप) क्रमांक पटकावला. अमेरिकेतील मेजर लिग बेसबॉलच्या वतीने (एमएलबी) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते. या संघांना अमेरिकेतील नामवंत 12 बेसबॉल संघांची नावे दिली होती. यापैकी अमेरिकेत नुकत्याच झालेल्या वल्ड बेसबॉल सिरिजमध्ये विजेतेपद मिळवलेल्या ब्रेव्ह या संघाचे नाव वालावलकर हायस्कूलच्या संघाला देण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धेतील 12 संघामधून प्रत्येकी चार संघांचे 3 गट तयार केले होते. वालावलकर हायस्कूल कोल्हापूर ब्रेव्ह संघाच्या गटात केरळ, मध्यप्रदेश आणि दिल्ली या संघांचा समावेश होता.
स्पर्धेत कोल्हापूर संघाने आपल्या पहिल्या सामन्यात मध्यप्रदेश रेडसॉक्स संघाला 19-1 अशा धावफरकांनी तर दुसऱया सामन्यात केरळ टायगर या संघाला 15-2 धावफरकांनी पराभूत केले. कोल्हापूर संघाचा तिसरा सामना दिल्लीतील दिल्ली डॉटस् या संघासोबत झाला. यामध्ये कोल्हापूर संघाने दिल्ली डॉटस् संघावर 10-0 अशा धावफरकांनी दणदणीत विजय मिळवला. स्पर्धेच्या सांगतेनंतर 12 संघांमधून गुणानुक्रमे वरचढ ठरलेल्या संघांना विजेता, उपविजेता व तिसरा क्रमांक जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा ब्ल्यू जायस संघाने 51 गुणांसह विजेतेपद तर पुणे एंजल्स या संघाने 47 गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले. दमदार कामगिरी केलेल्या वालावलकर हायस्कूल कोल्हापूर ब्रेव्ह संघाने 42 गुणांसह तिसरा क्रमांक तर अहमदनगर ऍथलेटिक्स या संघाने 37 गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवला.
वालावलकर हायस्कूल कोल्हापूर ब्रेव्ह संघातील खेळाडूंना आंतर भारती शिक्षण मंडळाच्या चेअरमन पल्लवी कोरगावकर, सचिव एम. एस. पाटोळे, मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर, पर्यवेक्षक वंदना काशीद, प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, गौरव पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बक्षीस वितरण समारंभात आशिया खंडातील मेजर लिग बेसबॉलचे प्रमुख रिक डेल (अमेरिका), एमएलबीचे इंडिया प्रमुख डेव्हिड पलसे व रिओ टकासी यांच्या हस्ते वालावलकर हायस्कूल कोल्हापूर ब्रेव्ह संघाला चषक आणि पदके देऊन गौरवण्यात आले.