चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचा अमेरिकेशी करार वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीन सीमेवरील तणाव पाहता भारत स्वतःच्या संरक्षण खरेदीला गती देत आहे. शस्त्रास्त्र यंत्रणांपासून क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्याला प्राधान्य दिले जात आहे. परंतु गरजेनुसार विदेशातूनही संरक्षण सामग्रीची खरेदी केली जात आहे. संरक्षण मंत्रालय अमेरिकेकडून 30 जनरल एटॉमिक्स एमक्यू-9ए रीपर ड्रोन्सची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सुमारे 22 हजार कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार होऊ शकतो.
हा व्यवहार दोन हिस्स्यांमध्ये होणार आहे. प्रथम 6 रीपर मीडियम ऑल्टिटय़ूड लाँग एंडय़ोरेन्स डोन्स खरेदी केली जाणार असून त्यांचा पुरवठा पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहे. उर्वरित 24 ड्रोन्स पुढील 3 वर्षांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत. व्यवहाराच्या पहिल्या हिस्स्यात 4,440 कोटी रुपयांद्वारे 6 एमक्यू-9 ड्रोन तत्काळ खरेदी करण्यात येणार आहेत. याचा पुरवठा पुढील काही महिन्यांमध्येच होऊ शकतो.