ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील प्रसिद्ध मसाले कंपनी ‘महाशिया दी हट्टी’ अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज पहाटे पाच वाजून 38 मिनिटांनी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.
आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत सरकारने त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मान केला आहे. धर्मपाल गुलाटी हे जाहिरात विश्वातील सर्वात वयोवृद्ध स्टार आणि ‘महाशियां दी हट्टी’ (एमडीएच) चे मालक होते. मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. ते 2000 कोटी रुपयांच्या बिजनेस ग्रुपचे मालक होते. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 मध्ये पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर ते भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी मसाल्याचा उद्योग सुरू केला. त्यांची एमडीएच ही कंपनी आज भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. दुबईत देखील त्यांची फॅक्टरी आहे. सद्यस्थितीत एमडीएचची 62 उत्पादने बाजारात आहेत.