प्रतिनिधी/ लांजा
स्पर्धा परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याच्या नैराश्यातून मानसिक संतुलन बिघडलेल्या 26 वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथे घडली आहे.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोर्ले गावातील सहकारवाडी येथील महेश लक्ष्मण झोरे (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे आई, वडील व दोन भाऊ कामानिमित्त मुबईला राहतात. महेश याला एमपीएससी स्पर्धा परीक्षा देवून अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गावातील घरी एकटाच राहत होता.
महेश याला भेटण्यासाठी प्रभानवल्ली येथील त्याचे आजोबा अधूनमधून कोर्ले सहकारवाडी गावी येत असत. नेहमीप्रमाणे ते गुरूवारी नातवाला भेटण्यासाठी दुपारच्या दरम्याने आले असता त्यांना महेश हा गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.
महेश याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. स्पर्धा परीक्षेची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्या कारणाने माझे मानसिक सतुंलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या कारणाने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहे. असे महेश याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
दरम्यान, याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर हे करत आहेत.