प्रतिनिधी/ बेळगाव
एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलाक्यात, अशी मागणी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. जानेवारी 2021 मध्ये या परीक्षा होणार असून ऑनलाईन वर्ग परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसे पूरक ठरले नाहीत. परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ऑल इंडिया डेमोपेटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन कर्नाटक शाखेने राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुंची भेट घेऊन त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली. एमबीबीएसच्या एकूण 25 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर मत नोंदविले आहे. परंतु विद्यापीठाकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही.
ऑनलाईन वर्ग हे अभ्यासापुरते अपेक्षेइतके सक्षम ठरले नाहीत. प्रात्यक्षिके (प्रॅक्टिकल्स) पूर्ण झालेली नाहीत. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी आधी प्रॅक्टिकल वर्ग घेतले जावेत, अशी संघटनेची मागणी आहे. दरम्यान, 2016 बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांनीसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आम्हाला उत्तम डॉक्टर व्हायचे आहे. पुढे ढकलले गेलेले पदवीधर असा शिक्का आम्हाला नको आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय तज्ञांच्या मते परीक्षेच्यादृष्टीने ऑनलाईन वर्ग सक्षम नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहता आले नाही, याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 45 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. शिवाय 1 डिसेंबरपासून महाविद्यालय सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेची तयारी करता येईल, असे कुलगुरु डॉ. एस. सच्चितानंद यांनी म्हटले आहे.