वृत्त संस्था/ मुंबई
भारताचे माजी कसोटीवीर तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील कुशल क्रिकेट प्रशासक आणि समालोचक सुनील गावसकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवानिनिमित्त मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे त्यांचा अनोखी भेट देवून गौरव केला जाणार आहे. येथील वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर यांच्यासाठी कायम स्वरूपी बॉक्स त्यांना भेट म्हणून दिला जाणार आहे.
71 वर्षीय सुनील गावसकर यांनी 1971 साली विंडविरूद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या या पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 9 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित केलेल्या समारंभात सुनील गावसकर यांच्या या कामगिरीचा गौरव केला जाणार असून वानखेडे स्टेडियममध्ये त्यांच्यासाठी कायमस्वरूपी दोन जागा आरक्षित म्हणून ठेवल्या जातील.
मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे शनिवारी सुनील गावसकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील आणि सचिव संजय नाईक यांनी वानखेडे स्टेडियमवर उपलब्ध करून देण्यात आलेला खास बॉक्स गावसकर यांना दाखविला. या बॉक्समध्ये 10 ते 12 व्यक्तींना बसण्याची सोय करण्यात आली आहे. गावसकर यांनी 6 मार्च 1971 ला आपले कसोटी पदार्पण विंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेत पोर्ट ऑफ स्पेन येथे केले होते. या सामन्यात गावसकर यांनी पहिल्या डावात 65 तर दुसऱया डावात नाबाद 67 धावा जमविल्या. या मालिकेत गावसकर यांनी 154.80 धावांच्या सरासरीने 774 धावा जमविल्या होत्या. भारतीय संघाने बलाढय़ विंडीजचा त्यांच्या भूमीत पहिल्यांदा पराभव करण्याचा पराक्रम केला होता. कसोटी मालिकेतील पदार्पणात सर्वाधिक धावा जमविण्याचा गावसकर यांचा पराक्र
म अबाधित आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती जेआरडी टाटा आणि गावसकर यांच्याकरिता गरवारे पॅव्हेलनमध्ये समोरच्या रांगेत प्रत्येकी दोन जागा आरक्षित राहतील.