नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून ‘एम्स’ रुग्णालयातील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. याआधी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिकांसह रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनाही कोरोनाची वेगाने लागण होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतल्यानंतर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर आणि एम्समधील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डीएस राणा यांची तातडीने भेट घेत या विषयावर चर्चा केली. दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोना पुन्हा वाढत आहे. गेल्या पाच दिवसातील आकडा भितीदायक आहे. दिल्लीमध्ये 4 एप्रिलला 4,033, 5 एप्रिलला 3,548, 6 एप्रिलला 5,100, 7 एप्रिलला 5,506 आणि 8 एप्रिलला 7,437 रुग्ण आढळले होते. नव्या रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढत असल्याने केजरीवाल सरकारसमोरील आव्हाने वाढली आहेत.