सद्यकाळात लॉस एंजिलिसचे महापौर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकन काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या समितीने भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून लॉस एंजिलिसचे महापौर एरिक एम. गार्सेटी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. गार्सेटी यांच्यासह सिनेटच्या शक्तिशाली विदेश विषयक समितीने बुधवारी 11 अन्य राजदूतांच्या नावांनाही मंजुरी दिली आहे. यात जर्मनीतील अमेरिकेचे राजदूत म्हणून एमी गुटमॅन, पाकिस्तानात डोनाल्ड आर्मिन ब्लोम तसेच होली सीमध्ये जोए डोनेली यांची नियुक्ती सामील आहे. आता या नावांना अंतिम मंजुरीसाठी सिनेटसमोर ठेवले जाणार आहे.
समितीसमोर अद्याप 55 नामांकन प्रलंबित असल्याने सिनेटच्या विदेश विषयक समितीचे अध्यक्ष सिनेटर बॉब मेनेंदेज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगभरात अनेक आव्हाने असताना दीर्घ काळापर्यंत पदे रिक्त ठेवणे अमेरिकेच्या हिताचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या समितीत 22 सिनेटर्स असून यात डेमोक्रेट आणि रिपब्लिकन सिनेटर्सची समान भागीदारी राहिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 9 जुलै रोजी गार्सेटी यांच्या नामांकनाची घोषणा केली होती.
एरिक एम. गार्सेटी हे 2013 पासून लॉस एंजिलिसचे महापौर आहेत. 12 वर्षांपर्यंत ते सिटी कौन्सिलचे सदस्य देखील राहिले आहेत. यात कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 6 वेळा पदभार भूषविला आहे. 50 वर्षीय गार्सेटी हे शहराचे पहिले ज्यू महापौर आहेत.