मडगावच्या विभागीय व्यवस्थापकावर गुन्हा नोंद : मालमत्ता‘व्हॅलुएशनर’ची बनावट सही, रबर स्टँप
प्रतिनिधी /मडगाव
कट कारस्थान रचून, कागदपत्रात फेरफार करुन एलआयसी हावसिंग फायनान्स लिमीटेड या कंपनीला सुमारे कित्येक कोटींना गंडा घातल्याच्या आरोपावरुन फातोर्डा पोलिसानी या कंपनीच्या मडगाव शाखेचे विभागीय व्यवस्थापक हेमंत सूर्यवंशी व इतर दोन संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
भारतीय दंड संहितेच्या 465, 468, 471, 120-ब कलमाखाली या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फ्लॅट वा इतर प्रॉपर्टीच्या ‘व्हॅलुएशन अहवाला’त फेरफार केल्याचा या प्रकरणातील संशयिताविरुद्ध आरोप आहे.
एलआयसी हावसिंग फायनान्स लिमीटेड या कंपनीचे ‘पॅनेल व्हॅल्युएर’ तसेच आर्कीटेक्ट जोजेफ किरांचिरा यांनी या एकंदर प्रकरणासंबंधी फातोर्डा पोलीस स्थानकात रितसर तक्रार केलेली आहे. मनोजकुमार कोडापुल्ली आणि एम. झेव्हीयर हे या प्रकरणातील इतर दोघे संशयित असल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.
एलआयसी हावसिंग फायनान्स लिमीटेड या कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थीत होत नसल्याचे कंपनीच्या लक्षात आले तेव्हा फ्लॅटच्या ‘व्हॅलुएशन’मध्ये गडबड केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार संशयित कोडापुल्ली याने या कंपनीकडून दोन कर्जे घेतली तर एम. झेव्हीयर यांनी एक कर्ज घेतले. मात्र, या कर्जाची परतफेड होईना तेव्हा रिकव्हरी अधिकाऱयाने केलेल्या प्राथमीक चौकशीत हा घोटाळा उघडकीस आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर व्हॅल्युएरने हा प्रकार कंपनीच्या मुख्यालयाच्या निदर्शनाला आणून दिला. ही घटना प्रत्यक्षात मार्च 2020 मध्ये घडली होती. मात्र पोलीस तक्रार हल्लींच करण्यात आली.
या घोटाळय़ासंदर्भांत स्थानिक पातळीवर किंवा मुख्यालयाकडून सखोल चौकशी होत नसल्याचे पाहून व्हॅलूइरने या प्रकरणी पोलीस तक्रार केली.
या प्रकरणातील काही संशयित आरोपीनी व्हॅल्युएरची बनावट सही मारली आणि बनावट रब्बर शिक्का मारुन अहवाल तयार केल्याचा आरोप आहे आणि हा अहवाल खरा असल्याचे भासवून एलआयसी हावसिंग फायनान्स लिमीटेड या कंपनीला सादर केला. या (बनावट) अहवालानुसार कोडापुल्ली आणि झेव्हीयर यांना एलआयसी हावसिंग फायनान्स लिमीटेड या कंपनीने मोठय़ा रकमेची कर्जे वितरीत केली होती.
फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर तपास करीत आहेत.