तालिबानच्या अफगाणिस्तानमधील विजयात भूमिका
अफगाणिस्तानातील लोकशाही उलथवून टाकण्यासाठी तालिबानची मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून प्रशिक्षित आणि पाठविण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख आता समोर येऊ लागली आहे. या दहशतवाद्यांमध्ये मोठय़ा संख्येत पंजाब प्रांतातील दहशतवादी होते, या दहशतवाद्यांना तालिबानला मजबुत करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या तळांवर प्रशिक्षण दिल्यावर सैन्याकडून पाठविण्यात आले होते.
पाकिस्तानचा पंजाब प्रांत दोन कुख्यात सैन्यपुरस्कृत दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदला सामावून आहे. पंजाब प्रांतातील 10 हजारांहून अधिक दहशतवादी तालिबानच्या बाजूने लढल्याचा अनुमान आहे. कंधारमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तालिबानसोबत मिळून लढताना दिसून आले आहेत. युद्धादरम्यान लष्कर-ए-तोयबाचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
मृतदेह घरी पोहोचविले
लष्कर-ए-तोयबाच्या टीमचे नेतृत्व दहशतवादी सैफुल्ला खालिद करत होता, तो कंधारच्या नवाही जिल्हय़ात 11 दहशतवाद्यांसह मारला गेला. खालिदची जागा त्यानंतर पंजाब प्रांतातील इम्रान याने घेतली. इम्रान हा यापूर्वी काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. अफगाणिस्तानात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था पाकिस्तानने केली होती. पाकिस्तानने अफगाणिस्तानात जखमी झालेल्या लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवाद्यांसाठी तात्पुरते रुग्णालयही उभारले आहे. क्वेटा, डेरा इस्माइल खान, कराक, हंगू, कोहाट, पेशावर, मर्दन आणि नौशेरामध्ये दहशतवादी संघटनांकडून भरतीकरता बळजबरीचे प्रकारही घडले आहेत.
एलईटीची स्थिती मजबूत
90 च्या दशकापासून अफगाणिस्तानात लष्कर-ए-तोयबाचे अस्तित्व राहिले आहे. 2001 नंतरही दहशतवादी संघटनेने तालिबानसोबत प्रशिक्षण सुरूच ठेवले होते. पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनासह एलईटीने अफगाणिस्तानातील किमान 8 जिल्हय़ांमध्ये स्वतःची स्थिती मजबूत करण्यास प्रारंभ केला होता. अशाचप्रकारे जैश-ए-मोहम्मदलाही नंगरहार प्रांतात काही तळ निर्माण करता आले, त्यांचा वापर पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये पाठविल्या जाणाऱया दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करत होते. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा हे अल-कायदाकडून सोडण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रांचा वापर पाकिस्तानातून भरती होणाऱया दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी करत आहेत. नव्या दहशतवाद्यांमधील बहुतांश जण पंजाब तसेच खैबर पख्तूनख्वा प्रांतातील आहेत.