सैन्याकडून सतर्कतेचा इशारा : जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथील घटना
वृत्तसंस्था/ पुंछ
भारतीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोन दिसून आल्याच्या घटनेनंतर सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी लढाऊ विमान दिसून आल्याने सैन्याला सतर्क करण्यात आले आहे. पाकिस्तानी लढाऊ विमान नियंत्रण रेषेपर्यंत येण्याच्या घटनेची चौकशी केली जात आहे. हा प्रकार चुकीने घडला का पाकिस्तानने एखाद्या कटाच्या अंतर्गत हे घडवून आणले याचा शोध सैन्य घेत आहे.
सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. सीमेवर तैनात सैनिकांना नियंत्रण रेषेनजीक लढाऊ विमानाचा आवाज ऐकू आला. याचरोबर आकाशात लढाऊ विमानही दिसून आले. भारतीय सैन्याने कारवाई करण्यापूर्वीच लढाऊ विमानाने पोबारा केला आहे.
पाकिस्तानकडून आलेल्या या लढाऊ विमानासंबंधी माहिती प्राप्त करण्याचे प्रयत्न गतिमान करण्यात आले आहेत. पाकिस्तानी विमानाचे हे उड्डाण प्रशिक्षणासाठी होते का सीमेवरील सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी होते याचा थांगपत्ता लावला जात आहे. लढाऊ विमानावर एखादे हेरगिरीचे उपकरण होते की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु या घटनेनंतर सीमेवर तैनात सैनिक आणि नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांमधील लोकांना सतर्क करण्यात आले आहे.