नौशेरा येथे घडला प्रकार
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हय़ात पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) गस्त घालत असलेले सैन्याचे एक पथक भुसुरुंगाच्या स्फोटाच्या तावडीत सापडले आहे. पीरपंजाल क्षेत्रातील नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये शनिवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत तीन सैनिक जखमी झाले असून त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये सामील एक लेफ्टनंट आणि एक सैनिक हुतात्मा झाला आहे. तर एका सैनिकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱयाने दिली आहे.
भूसुरुंग स्फोटाच्या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या स्फोटात लेफ्टनंट ऋषी कुमार आणि सैनिक मंजीत सिंह यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. ऋषी कुमार हे बिहारच्या बेगूसरायचे रहिवासी होते. तर मंजीत हे पंजाबच्या भटिंडा जिल्हय़ातील सिरवेवाला गावचे रहिवासी होते.
लेफ्टनंट ऋषी कुमार यांनी एक वर्षापूर्वीच सैन्यात प्रवेश मिळविला होता. ऋषी यांच्या बहिणीचा 29 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता आणि याकरता कुटुंबीय तयारी करत होते. 22 नोव्हेंबर रोजी ऋषी हे बहिणीच्या विवाहात सामील होण्यासाठी घरी येणार होते. पण तत्पूर्वीच त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.