मिलिंद नाईक यांना पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा तालुक्यातील राजकारणात मंत्री माविन गुदिन्हो बजावणार महत्वाची भुमिका
प्रतिनिधी /वास्को
कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाना यांच्या राजीनाम्यानंतर वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही आमदारकीचा आणि भाजपाचा राजीनामा दिला आहे. मुरगावचे आमदार आणि माजीमंत्री मिलिंद नाईक पक्षाच्या अंतीम निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या उमेदवारीवर गडांतर येऊ शकते. मंत्री माविन गुदिन्होच सद्या सुरक्षीत असून मुरगाव तालुक्यातील भाजपाच्या राजकारणात आता तेच महत्वाची भुमिका बजावू शकतात अशी चर्चा आहे.
मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मुरगाव तालुका भाजपाबरोबर राहिलेला आहे. 2012 साली झालेल्या निवडणुकीत या तालुक्यातील चारपैकी तीन जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यानंतर मागच्या निवडणुकीत मुरगाव तालुक्याला भरभरून यश दिले. कुठ्ठाळी, दाबोळी, मुरगाव व वास्को अशा चारही मतदारसंघात कमळ फुलले होते. मुरगाव तालुक्याच्या राजकारणातील हा विक्रम होता. आता भाजपा येणाऱया निवडणुकीला सामोरा जात असतानाच पक्षात पडझड झालेली आहे. पक्षाला ही पडझड अपेक्षीत असली तरी धोक्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अंतर्गंत राजकारणाला कंटाळून एलिना साल्ढाना चार दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपापासून दूर झाल्या होत्या. काल मंगळवारी कार्लुस आल्मेदा यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपाचा निरोप घेतला. आता पाळी आहे मुरगाव मतदारसंघाची. वासनाकांडामुळे सबंध गोव्याच्या नजरा मुरगाव मतदारसंघाकडे वळलेल्या आहेत. मिलिंद नाईक यांचे मंत्रीपद गेलेले असले तरी आमदारकी शिल्लक आहे. आमदार मिलिंद नाईक यांना पुन्हा भाजपाची उमेदवारी देण्याचे धैर्य भाजपा दाखवेल काय याबाबत चर्चा जोरात आहे. आमदार मिलिंद नाईक यांनाही पक्षाच्या पुढील निर्णयाची घोर प्रतीक्षा आहे. दाबोळीचे आमदार व मंत्री माविन गुदिन्हो हेच तेवढे उमेदवारीसाठी सुरक्षीत असून येत्या निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील राजकारणात तेच महत्वाची भुमिका बजावू शकतात.
भाजपा आणि साल्ढाना कुटुंबाचा विस वर्षांपासूनचा घरोबा संपुष्टात
कुठ्ठाळीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन आम आदमी पार्टीत प्रवेशकर्त्या झालेल्या एलिना साल्ढाना यांनी साल्ढाना कुटुंबाचा गेल्या विस वर्षांपासूनचा भाजपाशी राहिलेला घरोबा संपुष्टात आणला आहे. ख्रि. माथानी साल्ढाना 2002 साली प्रथमच आमदार झाल्यानंतर ते माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे साथी बनले होते. पुढे कठीण काळातही माथानी साल्ढाना यांनी भाजपा व मनोहर पर्रीकर यांची साथ सोडली नाही. आमदारकीच्या अपात्रतेलाही ते सामोरे गेले. पुढे 2007 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युगोडेपाचे उमेदवार असून कुठ्ठाळीत भाजपाने आपला उमेदवार उभा न करता माथानी साल्ढाना यांना पाठींबा दिला होता. हा प्रयोग अयशस्वी ठरल्यानंतर 2012 सालच्या निवडणुकीवेळी माथानी साल्ढाना यांनी थेट भाजपामध्येच प्रवेश करून आणि या पक्षाच्या उमेदवारीवर विजयी होऊन कुठ्ठाळीसारख्या ख्रिस्तिबहुल मतदारसंघात इतिहास घडवला होता. या यशानंतर अवघ्याच काही दिवसांनी माथानी साल्ढाना यांची अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांची जागा पत्नी एलिना साल्ढाना यांनी घेतली. पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर बिनविरोध निवडून येण्याचा इतिहास त्यांच्या नावावर आहे. एलिना साल्ढाना यांनी तत्कालीन सरकारमध्ये मंत्रीपदही भुषवीले. मागच्या निवडणुकीत पुन्हा त्यांनी यश मिळवले. मंत्रीपद मिळाले नसले तरी पक्षात मानाचे स्थान होते. मागच्या दोन वर्षांच्या काळात मात्र, भाजपा आणि एलिना साल्ढाना यांच्यातील संबंध दुरावत गेले. हा आता साल्ढाना आणि भाजपामधला इतिहास ठरला आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांनी साल्ढाना कुटुंबाचे मागच्या विस वर्षांपासूनचे सलोख्याचे संबंध संपुष्टात आणले. त्यांच्यावर उमेदवारी न मिळण्याची टांगती तलवार होती. ही शक्यता ओळखूनच एलिना साल्ढाना यांनी अखेरच्या क्षणापर्यंत न थांबण्याचा शहाणपणा दाखवला व नवा उमेदवार निवडण्यासाठी भाजपाचा मार्ग मोकळा केला. त्या आता कुठ्ठाळीतील आम आदमी पार्टीच्या उमेदवार असतील.
कुठ्ठाळीत भाजपाचा नवा चेहरा कोण मतदारांना उत्सुकता
एलिना साल्ढाना यांनी भाजपाचा मार्ग मोकळा केलेला असला तरी भाजपाला अद्याप या मतदारसंघासाठी नवा चेहरा गवसलेला नाही. केवळ चाचपणीच होत आहे. या पक्षाकडे पक्षाचे तळमळीने कार्य करणारे काही कार्यकर्ते कुठ्ठाळीत आहेत. मात्र, पक्षाला जिंकण्याची शाश्वती असलेला उमेदवार लागेल. त्यामुळे पक्षाचा भर रेडिमेड उमेदवारावर असेल यात संशय नाही. दोन वेळा जिल्हा पंचायत सदस्यपदी निवडून आलेले ऍन्थनी वास यांना भाजपाने मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत अप्रत्यक्ष पाठींबा दिला होता. आताही भाजपाची नजर त्यांच्यावरच आहे. भाजपाचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष व सांकवाळचे पंच तुळशिदास नाईक तसेच सांकवाळचे माजी सरपंच व विद्यमान पंच नारायण नाईक हेसुध्दा कुठ्ठाळीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले हेसुध्दा भाजपाच्या उमेदवारीवर निवडणुक लढवण्यास ईच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
कार्लुस आल्मेदा यांनीही केला भाजपाचा मार्ग मोकळा
वास्कोत कार्लुस आल्मेदा यांच्या जागी भाजपातर्फे दाजी साळकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. साळकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर वास्कोतील भाजपात फुट पडलेली आहे. कार्लुस आल्मेदा यांच्या दुसऱया पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. अखेर त्यांनी आमदारकीचा राजीनामा आणि पक्षाचाही राजीनामा देऊन आपला आणि भाजपाचाही मार्ग मोकळा केला आहे. माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्कोतून दोनवेळा निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. त्यांचाही मागच्या दहा वर्षांपासूनच भाजपाशी असलेला घरोबा आता संपुष्टात आलेला आहे. कार्लुस आल्मेदा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कार्लुस आल्मेदा यांना काँग्रेस प्रवेश तारणार की दाजी साळकर यांना भाजपा प्रवेश तारणार हे येणाऱया काळात स्पष्ट होईल. भाजपाने वास्को मतदारसंघाला सतत सापत्नभावाची वागणुक दिल्याचा आरोप माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला आहे.
मिलिंद नाईक यांना पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा
भाजपाच्या दृष्टीने कुठ्ठाळी आणि वास्कोच्या प्रश्नाचा निकाल लागलेला असला तरी भाजपासमोर मुरगाव मतदारसंघाने गहन प्रश्न उभा केलेला आहे. मुरगाव तालुक्यातील हा मतदारसंघ भाजपाने सतत तीन वेळा जिंकलेला आहे. मागच्यावेळी काटावर जिंकलेल्या या मतदारसंघावर यावेळी वासनाकांडाचे सावट पसरलेले आहे. याचे गंभीर धोके जाणवण्याची शक्यता असल्याने आमदार मिलिंद नाईक यांच्या उमेदवारीवर गडांतर येऊ शकते. मात्र, भाजपाकडे या मतदारसंघात विजयासाठी सक्षम उमेदवाराची चणचण आहे. पक्ष मुरगावबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आमदार मिलिंद नाईक यांनाही पक्षाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. पक्षाचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच आमदार मिलिंद नाईक आपला निर्णय घ्यायला मोकळे होतील.
मुरगावच्या राजकारणात मंत्री माविन गुदिन्हो बजावू शकतात महत्वाची भुमिका
भाजपालाच नकोसे झालेले मुरगाव तालुक्यातील दोन मोहरे भाजपापासून आता दुरावले आहेत. तिसरा मोहरा दुरावण्याच्या वाटेवर आहे. मुरगावच्या राजकारणात आतापर्यंत सुरक्षीत राहिलेला आहे तो दाबोळी मतदारसंघ. हा मतदारसंघ भाजपाला उमेदवारीच्याबाबतीतही सुरक्षीत आणि अंतर्गंतही राजकारणापासूनही दूरच आहे. विजयाचा दावा करण्याची संधीही या मतदारसंघात भाजपाला आहे. दाबोळीचे आमदार व मंत्री माविन गुदिन्हो हेच आता मुरगाव तालुक्यातील भाजपाचे तारणहार असून तेच महत्वाची भुमिका बजावू शकतात.