वृत्तसंस्था/ केबेरा
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत कर्णधार डीन एल्गार आणि कीगन पीटरसन यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात चहापानापर्यंत 3 बाद 199 धावा जमविल्या. एल्गारने 70 तर पीटरसनने 64 धावा जमविल्या.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी मोठय़ा फरकाने जिंकून आघाडी मिळविली आहे. ही मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत खेळविली जात आहे. या दुसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाला सावध सुरुवात केली. कर्णधार एल्गार आणि इर्वि या सलामीच्या जोडीने 12 षटकात 52 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या खलिद अहमदने इर्विला दासकरवी झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 4 चौकारासह 24 धावा जमविल्या. एल्गार आणि पीटरसन यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 20.5 षटकात 81 धावांची भर घातली. तैजुल इस्लामने कर्णधार एल्गारला झेलबाद केले. त्याने 89 चेंडूत 10 चौकारासह 70 धावा झळकविल्या. एल्गार बाद झाल्यानंतर पीटरसन व बवुमा यांनी तिसऱया गडय़ासाठी 51 धावांची भागीदारी केली. तैजुल इस्लामने पीटरसनला पायचित केले. त्याने 124 चेंडूत 9 चौकारासह 64 धावा जमविल्या. चहापानावेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 58 षटकात 3 बाद 199 धावा जमविल्या होत्या. बवुमा 3 चौकारासह 33 तर रिकेल्टन 1 चौकारासह 7 धावावर खेळत आहेत. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 49 धावात 2 तर खलिद अहमदने 41 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक (चहापानापर्यंत) ः दक्षिण आफ्रिका प. डाव 58 षटकात 3 बाद 199 (एल्गार 70, इर्वि 24, पीटरसन 64, बवुमा खेळत आहे 33, रिकेल्टन खेळत आहे 7, टी. इस्लाम 2-49, खलिद अहमद 1-41).