वृत्तसंस्था/ दरबान
येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 367 धावात आटोपला. कर्णधार एल्गार, बवुमा यांनी अर्धशतके झळकविली. बांगलादेशतर्फे खलिद अहमदने 4 गडी बाद केले.
या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 233 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 121 षटकात 367 धावात आटोपला. कर्णधार एल्गारने 101 चेंडूत 11 चौकारांसह 67 धावा जमविताना इर्व्हीसमवेत सलामीच्या गडय़ासाठी 113 धावांची भागिदारी केली. इर्व्हीने 6 चौकारांसह 41 धावा जमविल्या. किगन पीटरसन 3 चौकारांसह 19 धावांवर बाद झाला. बवुमाने 190 चेंडूत 12 चौकारांसह 93 धावा झळकविल्या. त्याचे शतक 7 धावांनी हुकले. रिकेल्टनने 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. व्हेरेनी आणि बवुमा यांनी पाचव्या गडय़ासाठी 65 धावांची भागिदारी केली. हार्मरने 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 38 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे खलिद अहमदने 92 धावात 4, मेहदी हसन मिराजने 94 धावात 3 तर हुसेनने 86 धावात 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी बांगलादेशने पहिल्या डावात बिनबाद 12 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका प. डाव 121 षटकात सर्वबाद 367 ( बवुमा 93, एल्गार 67, इर्व्ही 41, रिकेल्टन 21, व्हेरेनी 28, केशव महाराज 19, हार्मर नाबाद 38, पीटरसन 19, खलिद अहमद 4-92, मेहदी हसन मिराज 3-94, हुसेन 2-86).