रामघाट रोडवर लक्ष्मी टेकडी येथे दुरुस्ती
प्रतिनिधी / बेळगाव
रामघाट रोडवर लक्ष्मी टेकडी येथे जलवाहिनीला गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून लागलेल्या गळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. ‘तरुण भारत’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या जलवाहिनीच्या दुरुस्तीची जाग आली. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात आले.
शहरात सुरळीत पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लक्ष्मी टेकडी येथे रामघाट रोडवर दुभाजकाशेजारी जलवाहिनीला मोठी गळती लागली होती. पंधरा दिवसांपासून गळतीद्वारे पाणी वाहत होते. दररोज रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारकांनाही अडचणीचे बनले होते. जलवाहिनीची दुरुस्ती करून गळती निवारण करावी, अशी तक्रार एल ऍण्ड टी कंपनीकडे करण्यात आली होती. पण दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून तरुण भारतने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर जलवाहिनी दुरुस्तीला गुरुवारचा मुहूर्त मिळाला. जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून दुरुस्ती करण्यात आली. याकरिता दुभाजक हटविण्यात आला
आहे.
जलवाहिनीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात होते. परिणामी दुचाकी वाहनधारकांच्या आणि पादचाऱयांच्या अंगावर पाणी उडत होते. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.