कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण बैठकीत पाणीपुरवठा-थकीत पाणी बिलाबाबत चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंटमध्ये पाणीपुरवठय़ाची जबाबदारी आणि पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी केली. पाणीपट्टीची थकबाकी शिल्लक असल्याने ती जमा करण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीने पत्र पाठविले आहे. ही रक्कम भरण्याबाबत कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चा झाली.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी बैठकीत थकीत पाणीपट्टीच्या मुद्यावर चर्चा झाली. थकीत बिलासाठी एल ऍण्ड टी कंपनीने कॅन्टोन्मेंटकडे विचारणा केली आहे. ही रक्कम वाढत चालल्याने दंडाची रक्कमदेखील वाढत आहे. त्यामुळे ही रक्कम भरण्याबाबत चर्चा झाली. नागरिक विद्युत बिलाची रक्कम वेळेवर भरणा करतात, मग पाणीपट्टी का भरत नाहीत, असा मुद्दा ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा रक्कम थकण्याची कारणे विचारली. सदर रक्कम का भरली नाही? अशी विचारणा अधिकाऱयांना केली.
यावर महानगरपालिकेपेक्षा कमी पाणीपट्टी आकारली जाते. पाणीपट्टीची रक्कम वाढविल्यास नागरिकांकडून विरोध होतो. त्यामुळे ही थकबाकी आहे. तसेच कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याने पाणीपट्टी भरता आली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे पाणीपट्टी वसुली करण्यासह पाणीपुरवठा नियोजनाचे काम एल ऍण्ड टी कडे सोपविण्याबाबत अभ्यास करण्याची सूचना अधिकाऱयांना केली.
कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रस्तेही खराब झाले असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक उपाय योजना राबविण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या विषयावर कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा करून जिल्हाधिकारी, खासदार, आमदारांना भेटून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पार्किंग शुल्क आकारणीबाबतही चर्चा करून निविदा मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सध्या कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याने कामगारांचे वेतन करणे तसेच विविध बिले अदा करणे अशक्मय असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी सांगितले. निधी जमा करण्यासाठी महसूल वाढविण्याची आवश्यकता आहे. अनधिकृत जाहिरात फलक व स्वच्छता अशा विविध माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे अध्यक्षांनी सांगितले. तसेच निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याकरिता आमदारांसोबत बेंगळूरला जाऊन माहिती घेण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांना केली. कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळूकर, अभियंते सतीश मण्णूरकर व अधिकारी यावेळी उपस्थित होते.