वार्ताहर / मडकई
गाळशिरे कवळे येथील 26 वर्षीय युवक आकाश पुरूषोत्तम नाईक यांनी छोटय़ा चमच्यावर साईबाबांची रांगोळी घालून ‘एशिया बुक ऑफ रिकॉर्ड’ केल्याबद्दल त्यांचा माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते कवळे पंचायतीत गौरव करण्यात आला.
कवळे पंचायत व माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, उपसरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य मनोज बोरकर, गौतम नाईक, श्वेता गावडे, उषा नाईक, द्रुपदा नाईक, सोनाली तेंडूलकर व पुरूषोत्तम नाईक आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
माजी मंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले, गिनीज ऑफ वर्ल्ड रिकोर्ड करण्याचा आकाश नाईक यांचा मानस आहे. त्यांचे हे स्वप्न पुर्णत्त्वास नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न निश्चीतच करावे. माधवराव ढवळीकर ट्रस्टचे त्यांना यापूढेही असेच सहकार्य लाभेल. त्यासाठी त्यांनी चिंता बाळगू नये. आकाशचे वडील पुरूषोत्तम यांनी 36 वर्षे लोकमान्य विद्यालयात सेवा बजावलेली आहे. त्यामुळे त्यांनी आकाशवर योग्य संस्कार केलेले आहे. अशीच रांगोळी घालून त्यांची कला आंतर राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवावी कलाविष्कार दाखविताना सर्जनशिलता अत्यंत महत्त्वाची असते. आकाश वयाने खूप लहान असल्याने पुढील काळात त्यांना कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान द्यायला संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी त्यांना शुभेच्छा व त्यांचे मनस्वी अभिनंदन.
सरपंच राजेश कवळेकर म्हणाले, कला क्षेत्रात रांगोळी चितारणारे अनेक कलाकार आहे. पण एवढय़ा सुक्ष्मकक्षात रांगोळी घालणे हे खुप जिकीरीचे व कठीण काम असते. आकाश नाईक यांनी त्यांचे अशी रांगोळी घालून त्यांचे कलाकौशल्य सिद्ध केलेले आहे. कवळे पंचायत, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर व आमदार सुदिन ढवळीकर यांचे त्यांना सहकार्य लाभेलेले आहे. यापूढे गावच्या युवकांना कलेच्या क्षेत्रात आमचे सर्वांचे सहकार्य असेल.
लहानपणापासून रांगोळी घालून अनेक बक्षिसे पटकावलेली आहे. कलेच्या क्षेत्रातून गाव व राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस होता. त्यासाठी कलेच्या क्षेत्रात आपल्याला अद्वितीय कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. हे जाणूनच ‘एशिया बूक ऑफ रेकॉर्ड केला’ यापुढे ‘गिनीज बुक रेकॉर्ड’ केला जाईल. आपल्या आमदार सुदिन ढवळीकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांच्या बरोबरच कटंमगाळदादा पंगड तसेच अनेक मित्र परिवारांचे सहकार्य लाभेलेले असल्याचे आकाश नाईक यांनी या गौरवाला उत्तर देताना सांगितले. यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे आमदार सुदिन ढवळीकर तर पंचायतीतर्फे सरपंच राजेश कवळेकर यांनी त्यांचा गौरव केला.
स्वागत मनुजा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन मनोज बोरकर यांनी तर उषा नाईक यांनी आभार मानले.