हणजूण येथील प्रकरण आणखीन सहाजण जाळय़ात सापडणार
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण येथील जमीन घोटाळा प्रकरणात आणखीन एक तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक केली असून, मोहम्मद सुहील सफी याच्यासह सात संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मोहम्मद सुहील सफी याला या अगोदर एसआयटीने अटक केली होती. नंतर त्याची सशर्थ जामीनावर सुटका झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव स्टीव्हन डिसोझा असे आहे. जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करण्यात मास्टर माईंड असलेल्या मोहम्मद सुहील सफी याच्यासह सातजणांनी मिळून हणजूण येथील एक जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली होती. नंतर त्या जमिनीतील काही भाग स्टीव्हन याने आपल्या नावावर केला होता, तर काही भाग आपल्या आजीच्या नावावर केला होता.
संपूर्ण व्यवहार बोगस
बनावट कागदपत्रे तयार केल्यानंतर स्टीव्हन याला जमिनीचा मालकी हक्क मिळाला. नंतर त्याने 2013 साली ती जमीन एका कंपनीला विकली होती व त्यातून कोटय़वधी रुपये मिळविले होते. गोव्यात जमीन घोटाळा प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा सदर कंपनीने स्टीव्हन डिसोझा याच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा कंपनीच्या लक्षात आले की जमिनीची कागदपत्रे बनावट आहेत आणि संपूर्ण व्यवहार बोगस झालेला आहे.
कंपनीच्या व्यवस्थापकाने स्टीव्हन डिसोझा याच्या विरोधात एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती. एसआयटीने भादंसं 465, 466,467,468,419,420 तसेच 120(बी) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. स्टीव्हन याची उलटतपासणी केली असता याप्रकरणात आणखीन सहाजण असल्याचे उघड झाले आहे. पोलीस त्यांना लवकरच ताब्यात घेतील.
दोनापावला येथे राहत असलेला संशयित स्टीव्हन डिसोझा याने सांतआंद्रे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. 2022 मतांनी त्याचा पराभव झाला होता.