मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश – पिडीतेचा मृत्यु , माथेफिरुला अटक
मुंबई
मुंबईतील साकीनाका येथे घडलेल्या अमानवी अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी यातील माथेफिरूला अटक केली आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. आरोपी मोहन चौहान या नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असेही ते म्हणाले
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची आपण संपूर्ण माहिती घेतली असून फॉस्ट ट्रकवर हा खटला चालवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य असून गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाहीही दिली आहे.
माथेफिरुचे संतापजनक कृत्य
मोहन चौहान असे या नराधमाचे नाव आहे. पिडीत महिलेवर अत्याचार करुन या माथेफिरुने तिच्या गुप्तांगात सळई घालण्याचा संतापजनक प्रकार केला होता. तर या प्रकरणामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या महिलेला जखमी अवस्थेत घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.
ज्योत्सना रासम यांचे पथक करणार तपास
सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याचेही नगराळे यांनी सांगितले. साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असे ते म्हणाले.
जबाब नोंदवता आला नाही
साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडितेवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाल्याने जबाब नोंद करता आला नाही. रुग्णालयात नेली तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेले आहे, याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वॉचमनने फोन केल्याने कळला प्रकार
10 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजून 20 मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथील एका पुठ्ठय़ाच्या कंपनीतील वॉचमनने कंट्रोल रुमला फोन करून इथे एका बाईला मारहाण सुरु असल्याची माहिती दिली. कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. तेथील अधिकारी दहा मिनिटात तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघडय़ा टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला त्याच टेम्पोतून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. तथापि तिचा मृत्यु झाला. चौकीदाराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला आयोगाची सुमोटो याचिका
साकीनाका प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुमोटो याचिका दाखल केल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबीयांना मदत करणार आहोत. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फास्ट ट्रकवर खटला चालवावा
साकीनाका दुर्घटनेची आपण माहिती घेतली आहे. महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे. झालेली घटना निंदनीय आहे. या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. खटला फास्ट ट्रकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री