वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबच्या बहुचर्चित कोटकपूरा गोळीबार प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल 22 जून रोजी एसआयटीसमोर उपस्थित राहणार आहेत. याची माहिती त्यांचे मुख्य सल्लागार हरचरण बैंस यांनी दिली आहे. प्रकाशसिंग स्वतःच्या अधिकृत निवासस्थानातच एसआयटीला सामोरे जाणार असल्याचे बैंस यांनी ट्विट करत सांगितले आहे.
5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग 22 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता एसआयटीला सामोरे जाणार आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसली तरीही ते देशाच्या कायद्यावर विश्वास ठेवणारे आहेत. स्वतःची जबाबदारी आणि घटनात्मक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी ते प्रतिबद्ध असल्याचे बैंस यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर 2015 मध्ये श्री गुरु गंथ साहिबच्या अनादरानंतर निदर्शने करणाऱया लोकांवर कोटकपूरा येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री होते. याप्रकरणी गोळीबार कुणाच्या आदेशावर करण्यात आला होता याचा शोध एसआयटी घेत आहे.
पोलिसांच्या गोळीबारत दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी स्वयंरक्षणार्थ गोळीबार केला होता का राजकीय दबावातून हे पाऊल उचलले होते याचा तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे.