श्री चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा : एसआरएस, विघ्नहर्तासह मराठा स्पोर्ट्सचीही आगेकूच
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
श्री चषक खडकगल्ली स्पोर्ट्स क्लब आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स, एसआरएस हिंदुस्थान, विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. प्रसाद नाकाडी, विकी, दर्शन, संदीप मकवान, अरविंद निमुळकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 2 बाद 102 धावा केल्या. प्रसाद नाकाडीने 45, जावेदने 36 धावा केल्या. त्याला उत्तर देताना यूपी इलेव्हन स्टार संघाने 8 षटकात 9 बाद 59 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे राहुलने 3 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात इंदिरा पॉईंटने 8 षटकात 6 बाद 32 धावा केल्या. आकाश पाटीलने 18 धावा केल्या. एसआरएसतर्फे विकी राजेरीने 2 गडी बाद केले. याला उत्तर देताना एसआरएस हिंदुस्थानने 2.3 षटकात 1 बाद 35 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. नरेंद्रने 20, देवराज कोटीने 15 धावा केल्या.
तिसऱया सामन्यात कलमेश्वर स्पोर्ट्स संघाने 7.4 षटकात सर्व बाद 38 धावा केल्या. त्यात परशराम निलजकरने 15 धावा केल्या. विघ्नहर्तातर्फे सदाशिव नाईक व दर्शन बांदेकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना विघ्नेश्वर स्पोर्ट्स अनगोळने 2.5 षटकात 2 गडी बाद 41 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. दाजी नाईकने 21 तर दर्शनने 17 धावा केल्या.
चौथ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने 8 षटकात 2 बाद 123 धावा केल्या. संदीप मकवानाने 68 तर नरेंद्रने 25 धावा केल्या. त्याला उत्तर देताना एस. आर. वॉरियर्सने 8 षटकात 5 बाद 40 धावाच केल्या. एस. आर. हिंदुस्थानतर्फे साहील मोमीनने 4 गडी बाद केले. पाचव्या सामन्यात मराठा स्पोर्ट्सने 8 षटकात 5 बाद 49 धावा केल्या. त्यात मनोज पाटीलने 22 धावा केल्या. विघ्नहर्तातर्फे अरविंद निमुळकर व सदाशिव नाईक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना विघ्नहर्ताने 5 षटकात 2 बाद 52 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला.