वार्षिक परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची तारीख अद्याप नाही जाहीर :
प्रतिनिधी / बेळगाव
एसएसएलसी हा शालेय जीवनाचा अंतिम टप्पा. मात्र कोरोनामुळे हा अंतिम टप्पा नेमका कधी पूर्ण होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरअखेर एसएसएलसीच्या अंतिम परीक्षेचे ऑनलाईन अर्ज केले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे ना परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे ना परीक्षेचे अर्ज करण्यात आले आहेत. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी परीक्षेबाबतचे चित्र अजूनही अस्पष्टच आहे.
कोरोनाच्या संकटामुळे एसएसएलसीची वाटचाल सुरू होण्यापूर्वीच अडकली. व्हेकेशन बॅच तसेच जादा तासिका तर नाहीच, शिवाय प्रत्यक्ष वर्गदेखील घेण्यात आले नाहीत. याशिवाय अभ्यासक्रमाची पूर्तता करताना 30 ते 40 टक्के कपात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षातील अंमलबजावणी नियमात अडकून पडली. यामुळे दरवर्षीप्रमाणे एसएसएलसी परीक्षेचे ऑनलाईन अर्जदेखील भरण्यात आलेले नाहीत. माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अर्जाबाबतचे संकेत दिले नसल्याने सध्या परिस्थिती जैसे थे आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा विलंबाने होणार असून मे-जूनमध्ये होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात शाळा केंव्हा सुरू होणार हेच माहिती नसल्याने सर्व बाबींसमोर प्रश्नचिन्ह आहे. त्यातच परीक्षेसाठी अर्ज करण्याबाबतही परीक्षा मंडळाने चित्र स्पष्ट केलेले नाही. यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांबरोबरच विद्यार्थी-पालकदेखील अनभिज्ञ आहेत. विद्यागम योजना बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून दहावीचे शिक्षण सुरू असले तरी कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने परीक्षा केंव्हा होतील आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अर्ज पेंव्हा भरण्यात येतील याचा निर्णय राज्य शिक्षण विभागाकडून घेण्यात येईल, असे मत जिल्हा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आले.