किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : 70 व्या वाढदिवसानिमित्त एसकेई सोसायटीतर्फे सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
सावंतवाडी येथे सुरू करण्यात आलेली एसकेई सोसायटी काही कारणाने बेळगावमध्ये आणण्यात आली. त्याकाळी संस्था चालवणे तितकेसे सोपे नव्हते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ देत संस्था उभी केली. त्यामुळेच आज लाखो विद्यार्थी या संस्थेने घडविल्या आहेत. यापुढेही संस्थेने असेच कार्य करत देशातील एक शिक्षणाचे मॉडेल म्हणून पुढे यावे, असे विचार एसकेई सोसायटीचे गर्व्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
किरण ठाकुर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर एसके सोसायटीचे चेअरमन सेवंती भाई शहा, सदस्य अजित सोलापूरकर, राज देशपांडे, सुधीर शानभाग, एस. वाय. प्रभू उपस्थित होते.
सेवंती भाई शहा यांनी किरण ठाकुर यांच्या कार्याचे कौतुक करत कै. बाबुराव ठाकुर यांचा वसा ते पुढे चालवत असल्याचे सांगितले. किरण ठाकुर हे पत्रकार असल्यामुळे यांच्याकडे व्हिजन आहे. झपाटून काम करण्याचा त्यांच्या इच्छाशक्तीमुळे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. एसकेई सोसायटीला त्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून किरण ठाकुर यांचा वाढदिवस साजरा झाला. सोसायटीच्या विविध शाळा, महाविद्यालयामधील शिक्षकांनी किरण ठाकुर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आरपीडी, जीएसएस कॉलेज, व्ही. एम. शानभाग स्कूल, भंडारी स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्या मंदिर, हेरवाडकर स्कूल, मराठी टिचर टेनिंग कॉलेज, ज्ञान प्रबोधन मंदिर, खानापूर येथील वागळे कॉलेज, जांबोटी येथील बाबुराव ठाकुर कॉलेज यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर संतोष गुरव यांच्या हिंदी-मराठी गीतांचा हार्मनी ऑर्केस्ट्रा झाला.