पदभार रमेश कांबळे यांच्याकडे : प्रकाश रसाळ यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार का?
प्रतिनिधी / कणकवली:
एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक प्रकाश रसाळ यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात आलेली मुदतवाढ संपली आहे. त्यामुळे यंत्र अभियंता रमेश कांबळे यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, रसाळ यांनी सेवेच्या कालावधीत अडीच वर्षे आणि मुदतवाढीनंतर दोन वर्षे असे साडेपाच वर्षे एकाच पदावर काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळते की सिंधुदुर्गसाठी नवीन विभाग नियंत्रक दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
रसाळ यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक म्हणून एसटी महामंडळाच्या सेवा काळात चांगल्याप्रकारे काम केले होते. सेवानिवृत्तीनंतर रसाळ यांना पुन्हा विभाग नियंत्रकपदी मुदतवाढ देण्यात आली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी दोन वर्षे पुन्हा सिंधुदुर्गात विभाग नियंत्रक पदावर काम केले. त्यामुळे त्यांनी सुमारे साडेपाच वर्षे विभाग नियंत्रक म्हणून काम केले आहे.
दरम्यान, त्यांची मुदत गेल्या माहिन्यात संपली. त्यामुळे सद्यस्थितीत विभाग नियंत्रकपदाचा कार्यभार यंत्र अभियंता (चालन) रमेश कांबळे यांच्याकडे आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले परिवहनमंत्री जिल्हय़ाला विभाग नियंत्रक लवकरच देणार असल्याचे समजते. यात रसाळ यांना पुन्हा तिसऱया वर्षासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते एकाच पदावर पाचपेक्षा अधिक वर्षे काम केलेले असल्याने त्यांना मुदतवाढ दिल्यास ती अन्य जिल्हय़ात दिली जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. मात्र, परिवहन विभाग काय निर्णय घेते, याकडे सिंधुदुर्ग विभागाचे लक्ष लागून आहे. रसाळ यांना मुदतवाढ न मिळाल्यास जिल्हय़ासाठी विभाग नियंत्रक म्हणून नवीन चेहरा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.