मालवाहतुकीच्या अनुषंगाने दीड वर्षापूर्वीच महामंडळाने घेतलीय माहिती : राज्यात होणार 301 गोदामे, जिल्हय़ात कुडाळ येथे गोदाम शक्य
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या रा. प. महामंडळाने प्रवासी सेवेसोबतच मालवाहतूक सेवा सुरू केली. मात्र, कोरोनाच्या निर्माण झालेल्या संकटाचे संधीत रुपांतर करण्याच्या महामंडळाच्या या प्रयत्नांच्या अगोदरच मालवाहतुकीसाठी रा. प. महामंडळाने पाऊल टाकले होते. गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरण्याच्यादृष्टीने सर्व विभागांतून माहिती मागविण्यात आली होती. रा. प. महांडळाकडून राज्यात 301 गोदामांची बांधणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यात जिल्हय़ात कुडाळ व वेंगुर्ले या दोन ठिकाणी एसटीची विनावापर जागा उपलब्ध आहे. या दोन्ही ठिकाणी गोदाम बांधणीच्या अनुषंगाने दीड वर्षापूर्वी माहिती रा. प. महामंडळाने घेतली आहे. आता रा. प. महामंडळाने मालवाहतुकीवर भर देण्याची प्रक्रिया गतीमान केल्याने पुढील काळात सिंधुदुर्गमध्ये एसटीचे गोदाम होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
तरीही कुडाळ येथील जागा मध्यवर्ती असल्याने तेथे गोदाम होण्याची शक्यता अधिक आहे. राज्यात एसटी महामंडळ अशा 301 गोदामांची बांधणी करणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
गोदामांसाठी हालचाली सुरूच
कोरोनामुळे रा. प. महांडळाने मे 2020 पासून मालवाहतुकीच्या माध्यमातून एसटीला सावरण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरीही रा. प. महामंडळाने फेब्रुवारी 2019 पासूनच पुढील काळात मालवाहतुकीत उतरण्याचे संकेत दिले होते. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले होते. याअंतर्गत स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर गोदामांची निर्मिती करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या होत्या. एसटीला प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे रेल्वेप्रमाणेच एसटी महामंडळही स्वतंत्र मालवाहतूक सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने ही पावले उचलण्यात आलेली आहेत.
विभागीय कार्यालयांकडून माहिती
एसटीकडून मालवाहतूक करतानाच मालाची साठवणूक करण्यासाठी एसटीच्या विनावापर पडून असलेल्या जागांवर गोदामांची उभारणी करण्याच्या अनुषंगाने राज्यात एसटी महामंडळाकडून एकूण 301 जागांवर गोदामे उभारण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यानुसार सर्व विभागीय कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती.
कुडाळ येथे 90 गुंठे जागा
सिंधुदुर्ग विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्हय़ात कुडाळ येथे सुमारे 80 ते 90 गुंठे, तर वेंगुर्ले येथे 18 गुंठे जागा विनावापर असल्याबाबत महामंडळाला कळविण्यात आले होते. यातील वेंगुर्ले येथील जागा वाहतुकीच्यादृष्टीने काहिशी लांबची असल्याने कुडाळच्या ठिकाणी हे गोदाम होण्यासाठी अनुकूलता आहे. जिल्हय़ात वाहतुकीच्यादृष्टीने ही जागा मध्यवर्ती आहे. जिल्हय़ात किमान एक गोदाम होणार असल्यास ते कुडाळ येथे होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले होते. एसटीकडून मालवाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनेही तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
प्रत्येक आगार पातळीवर कलेक्शन सेंटर
त्यानुसार एसटीकडून प्रवासी वाहतुकीची मर्यादा संपलेल्या वाहनांना मालवाहतुकीचे वाहन म्हणून रुपांतरण करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. आता पुढील काळात एसटी मालवाहतुकीवर भर देणार असल्याने सिंधुदुर्ग उपलब्ध असलेल्या जागेत एसटीचे गोदाम निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवेत. तरच महामंडळाकडून सुरू असलेल्या मालवाहतुकीला अधिक बळ मिळणार आहे. एसटीकडून शेतकऱयांच्या मालांसहित सर्वच प्रकारच्या मालाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. एसटीने अशाप्रकारे गोदाम उपलब्ध केले तसेच शेतकऱयांचा माल पोहोचविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक आगार पातळीवर कलेक्शन सेंटर सुरू केल्यास भविष्यात या योजनेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राजकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची नितांत आवश्यकता आहे.