पर्यटकांच्या गरजा भागवणारी वैशिष्टय़पूर्ण बस
राजापूर
एसटी बसच्या ताफ्यात आता नवी कोरी पर्यटन बस दाखल होणार आहे. पर्यटकांना डोळय़ासमोर ठेऊन केलेल्या आधुनिक आणि वैशिष्टय़पूर्ण बसमधून आरामदायी पर्यटनाची मजा यामुळे लुटता येणार आहे.
लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटीने नजीकच्या काळात आधुनिकतेची कास धरली आहे. शिवशाही, स्लीपर कोच अशा प्रवाशांना सुखकर प्रवास देणाऱया बसेस मागोमाग एसटीने पर्यटन बस फेऱया सुरू केल्या आहेत. या पर्यटन बसफेऱयांसाठी एसटीच्या ताफ्यात आता आधुनिक वैशिष्टय़े असलेली बस दाखल होणार आहे. पर्यटक नजरेसमोर ठेऊनच या बसची निर्मिती करण्यात आली आहे.
या बसमधील बैठक व्यवस्था पुढून पाठीमागे चढत्या क्रमाने प्रेक्षागृहासारखी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना समोरील बाजूने प्रेक्षणीय ठिकाणे पाहता येणार आहेत. फ्लोअर हाईट वाढवण्यात आल्याने प्रवाशांना बाहेरील चारही बाजूची दृष्ये स्पष्ट पाहता येतील असे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना बाहेरचे दिसावे म्हणून अतिरिक्त काचा लावण्यात आल्या आहेत. यासाठी रूफवर मध्यभागी समान अंतरावर 3 फ्लॅट क्लीअर ग्लास, बल्क हेड पार्टीशनला उजव्या बाजूला दोन मोठय़ा काचा लावण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी बल्क हेड पार्टीशनला अतिरिक्त स्टीलचे 2 हँडल बार व 2 अतिरिक्त ग्रॅब हँडल बसवण्यात आले आहेत. गॅंगवेमध्ये प्रवाशांचे पाय घसरू नये म्हणून ऍन्टी स्कीड स्ट्रीप आहेत. प्रत्येक सीटला पर्स हुक व आकर्षक पारदर्शक हॅट रॅक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या खाली उतरूनही आपले सामान जागेवर आहे की नाही, दिसून येणार आहे. प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंगचे 2 पॉईंट देण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सूचनांसाठी बसमध्ये समोर बल्कहड पार्टीशनवर सूचना पेटी लावण्यात आली आहे. अतिरिक्त सामानासाठी 2 लगेज बुथ दिले आहेत. बसच्या मागील बाजूला एअर सस्पेंशन सिस्टीम आहे. त्यामुळे प्रवाशांना आराम मिळणार आहे. चालकाच्या केबीनध्ये अतिरिक्त काच बसवण्यात आली आहे. सहकारी चालकाच्या सीटला आरामासाठी फूटरेस्ट देण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त ग्रॅब हँडल देण्यात आले आहे. चालक केबिनमध्ये रूफ हॅच दिला आहे. त्यामुळे चालकाला अतिरिक्त हवा मिळून उष्णतेचा त्रास कमी हाणार आहे. जाहिरात करता यावी, या दृष्टीने पारदर्शक ग्रॅब हँडल बसवण्यात आले आहेत.
बसच्या पुढील बाजूस आकर्षक असा मार्ग फलक बसवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दूर अंतरावरूनच वाहनाचा मार्ग फलक दिसेल. तसेच बसच्या मागे बाहेरील बाजूस एलईडी मार्ग फलकाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या माहितीसाठी पीए सिस्टीम लावण्यात आली आहे. त्यामुळे स्थळांची माहिती व इतर माहिती प्रवाशांना देणे चालकांना सुलभ होणार आहे. तसेच मनोरंजनासाठी त्याचा वापर करता येणार आहे. आपत्कालीन स्थितीसाठी हुटर बसवण्यात आले आहेत. जेणेकरून काही इमर्जन्सी असल्यास प्रवाशांचे व रस्त्यावरील लोकांचे लक्ष वेधता येणार आहे. या बसला आकर्षक रंग संगतीमध्ये रंगवण्यात आल्याने ही बस प्रवाशांचे लक्ष वेधणार आहे.