प्रतिनिधी / कोल्हापूर
एसटीचे विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून कोल्हापूर आगारातील कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपामध्ये सहभागी झालेल्या 40 रोंजदार कर्मचार्यांना बुधवारी नोटीसा काढण्यात आल्या आहेत. नोटीसा मिळाल्यापासून 24 तासात कामावर हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर हे रोजंदार कर्मचारी कामावर हजर न झाल्यास, त्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे.
एसटी संपामुळे कोल्हापूर आगारातील कर्मचारी संपामध्ये उतरले आहेत. या संपामधून आजअखेर कोणताच तोडगा निघालेला नाही. एसटीचे विलिनीकरणावर व्हावे यावर हे कर्मचारी ठाम आहेत. यापूर्वी कोल्हापूर आगारातील 53 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर बुधवारी 40 रोंजदार कर्मचार्यांना कामावर हजर होण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत. या नोटीसा डिस्पॅच विभागाकडून पाठवण्यात आल्या असून, ही नोटीस कर्मचार्यांच्या हातात मिळाल्यापासून 24 तासात हजर व्हावे लागणार आहे.
गेल्या दोन दिवसापासून रोजंदारीवरील डेली वेजीस व टेंपररी कर्मचार्यांना नोटीसा काढण्याच्या हालचाली सुरू होत्या. यामध्ये गट क्रमांक एक मधील डेली वेजीस व गट क्रमांक दोन मधील चालक व वाहकांचा समावेश आहे. तर तांत्रिक विभागातील कर्मचारी कामावर आहेत. हे रोजंदारी कर्मचारी कामावर हजर होणार की नाही ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
रोजंदारी कर्मचार्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
या संपामुळे रोजंदार कर्मचार्यांची, ना घर का, ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे. बुधवारी इचलकरंजी आगारामधून 2 बसेस बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला होता. तर गडहिंग्लज व आजरा येथील नवीन 10 चालक, वाहक यांना कामावर हजर होण्याचा आदेश दिला होता. पण त्यांनी कामावर येण्यास नकार दिला असल्याचे सांगण्यात आले.