प्रतिनिधी / कणकवली:
एसटी महामंडळातील सिंधुदुर्ग विभागात वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून काम केलेले सेवानिवृत्त विभागीय वाहतूक अधीक्षक नंदकुमार गोपाळराव उर्फ एन. जी. कुलकर्णी (67) यांचे नुकतेच भारती हॉस्पिटल, पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नात, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
एन. जी. कुलकर्णी यांचे मूळ गाव बेळगाव-हिंडलगा. पदवीनंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी नवनीत प्रकाशनमध्ये काही काळ नोकरी केली. सन 1982 मध्ये एसटी महामंडळात वाहतूक निरीक्षक या पदावर ते सिंधुदुर्ग विभागात हजर झाले. एसटी विभागीय कार्यालयात वाणिज्य योजना, अपघात व चालन इ. ठिकाणी त्यांनी उत्तम प्रकारे काम केले. सिंधुदुर्ग विभागात वाहतूक निरीक्षक व नंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर बढती मिळत त्यांनी कोल्हापूर, रत्नागिरी व पुणे विभागातही काम केले. सन 2011-12 मध्ये ते एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले. सध्या ते पुणे येथे मुलाकडे स्थायिक होते. त्यांनी रत्नागिरी येथे हास्य क्लबची स्थापनाही केली होती. चालकांचा संपही त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता. अत्यंत मनमिळावू, कामाशी प्रामाणिक अशी त्यांची ओळख होते.