सांगली : प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सुरू आहे. संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २६८ कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर रुजू होण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. अन्यथा त्यांची सेवासमाप्ती केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे कर्मचारी कामावर हजर होणार काय ? याकडे लक्ष लागले आहे.
एसटीच्या महामंडळ राज्यशासनाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून राज्यातील विविध आगारांत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपाला सर्व आगारांतून पाठिंबा मिळत गेला. त्यामूळे दिवाळीनंतर सर्व सेवा ठप्प झाली. संपात सहभागी झाल्याबद्दल अनेकांचे निलंबन करण्यात आले. एसटीच्या सांगली विभागात आजवर १७९ जणांना निलंबित करण्यात आले आहे. संपाचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ नये, म्हणून प्रशासनाने खासगी वाहनांना स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शहरी बससेवेच्या तीन गाड्या दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आल्या होत्या. बुधवारी ती पुन्हा बंद करण्यात आली आहे; तर शिवशाहीच्या चार गाड्या सुरू आहेत.
संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २६८ कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुदतीत कामावर हजर न झाल्यास त्यांची सेवासमाप्ती केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे नोटीसबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. बुधवारी (१७) नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचारी कामावर हजर होणार, याची उत्सुकता लागली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी आगाराबाहेर प्रवासी वाहतूक करताना मनमानी भाडे घेतले जाते. पर्यायच नसल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.