प्रतिनिधी/ रत्नागिरी
दोन महिन्यांपूर्वी मुंबई बेस्ट सेवेच्या डय़ुटीला कौटुंबिक अडचणी कारणास्तव नकार दिल्याने आगार व्यवस्थापकांनी निलंबन केल्याने चालक संतोष ठाकुरदेसाई हे एसटी विभागाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
संतोष ठाकुरदेसाई यांना बेस्ट मुंबईची डय़ुटी आगाराकडून लावण्यात आली होती, मात्र वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी जाण्यास नकार दिला होता, याबाबत आपण अर्जदेखील दिला होता असे ठाकुरदेसाई यांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्याला बोलवण्यात आले होते. मात्र आपले म्हणणे योग्य पद्धतीने मान्य होत नसल्याने आपण उपोषण मागे घेणार नाही, या संपूर्ण प्रकरणाबाबत ठाकुरदेसाई यांनी एसटी महामंडळाकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन महामंडळने रत्नागिरी एसटी विभागाला चौकशीचे आदेश दिले होते, त्यामुळे एसटी विभागाने याबाबत चर्चा केली मात्र सशर्त अटी मान्य नसल्याने आपण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे ठाकुरदेसाई यांनी सांगितले.
30 तारखेला पुन्हा चौकशी
बेस्ट डय़ुटी वेळापत्रकानुसार सर्वांना लावली जाते, मात्र ही डय़ुटी करण्यास नकार दिला. लेखी कोणतीही कल्पना ठाकुरदेसाई यांनी दिली नसल्याचे आगार व्यवस्थापक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा झाली मात्र त्यांनी अटी मान्य नसल्याने उपोषण मागे घेतले नाही, येत्या 30 तारखेला पुन्हा चौकशी लावण्यात आली आहे, गैरसमजातून हा प्रकार घडला असावा मात्र यावर योग्य निर्णय घेण्यात येईल.