कणकवली तालुका शांतता समिती बैठकीत प्रांताधिकाऱयांच्या सूचना
गणेशोत्सवात वितरणने अखंडित वीजपुरवठा करावा!
प्रतिनिधी / कणकवली:
गणेशोत्सव कालावधीत येणाऱया भाविकांना योग्य सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बाजारपेठा, भाजी, फळमार्केट, रस्त्यालगतचे विक्रेते आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व अत्यावश्यक नियम पाळण्यात यावेत. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. गर्दी टाळावी व रा. प. बसेस पाठविताना निर्जंतुकीकरण करून पाठवाव्यात. वीज वितरणने अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिल्या.
येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सौ. राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली तालुका शांतता समितीची बैठक झाली. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पोलीस अधिकारी खंडागळे, डॉ. सतीश टांक, किशोर धुमाळे तसेच रेल्वे, रा. प. महामंडळ, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग व इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेशोत्सव कालावधीत बाजारपेठेत कमीत कमी गर्दी होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. रस्त्यावरील विक्रेत्यांबाबत अत्यावश्यक काळजी घ्यावी. शक्य असल्यास अशा विक्रेत्यांची आरोग्य तपासणी करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. गावागावात जाणाऱया एसटी बसेस निर्जंतुकीकरण करूनच पाठवाव्यात. बसस्थानक परिसरही वेळच्यावेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावा. गावपातळीवर पिण्याचे पाणी शुद्धिकरणाच्या अनुषंगाने टीसीएल टाकण्यात यावी. तसेच महावितरणने वीजपुरवठा खंडित होऊ नये, यादृष्टीने नियोजन करावे.
गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा! या कालावधीत रेल्वे सुरू झाल्यास रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी पथक व अत्यावश्यक काळजी घेण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेत व साध्या पद्धतीने साजरा करा. कोणत्याही प्रकारची गर्दी करू नका. शासनाकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करा. सार्वजनिक मंडळे तसेच वैयक्तिक पातळीवर गणेशमूर्तींच्या उंचीबाबतची दक्षता घ्या, असे आवाहनही सौ. राजमाने यांनी केले.