सावंतवाडी:
लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक व पार्सल सेवा बंद राहिल्याने महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. राज्य शासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून अटी घालून जिल्हा व राज्यांतर्गत बस व माल वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने काही प्रवासी फेऱया व माल वाहतूक गाडय़ा सुरू केल्या आहेत. या माल वाहतुकीला जिल्हय़ातून उद्योजक, कंपन्या व खासगी पार्सल वाहतूक करणाऱयांचा प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे येथे मालवाहतूक गाडीला प्रतिसाद मिळाला. संबंधित कंपनी, व्यक्ती यांनी दिलेल्या जागेवर माल पोच करण्याची व्यवस्था केली जात असल्याने एसटीच्या मालवाहक गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सावंतवाडी आगारातून पुणे ते सावंतवाडी व सावंतवाडी ते कुडाळ अशी दोनवेळा पार्सल वाहतुक करण्यात आली. मालाच्या टन व किलो वजनानुसार भाडे आकारले जात आहे. मालवाहक गाडी बंदिस्त असल्याने पार्सले सुरक्षित राहतात. आगारातून पहिली मालवाहक फेरी सावंतवाडी-माजगाव (उद्यमनगर) ते पुणे (कर्वेनगर) तर दुसरी फेरी सिंहगड (पुणे) ते कुडाळ एमआयडीसी करून माल पोच करण्यात आला. प्लास्टिक कंपनीचे मालक पांचाळ यांनी सेवेला प्रतिसाद दिल्याबद्दल आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वैभव पडोळे, अधिकारी ए. व्ही. राणे, एम. बी. नानचे यांनी पांचाळ यांचे आभार मानले.