प्रतिनिधी / कोल्हापूर
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत गेले पंधरा दिवस राज्यातील कर्मंचारी संपावर गेले आहेत. या संपाबाबत अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. असे असताना सोमवारी दुपारी पुणे आगारातील शिवशाही बसेस कोल्हापूर आगारात दाखल झाल्या. या बसेसना रोखण्यासाठी संपामध्ये असलेले कोल्हापूर आगारातील कर्मचारी आक्रमक झाले. यामुळे आगार परिसरातील वातावरण तंग झाल्याने, पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. यामुळे ही तिसरी शिवशाही बस आगाराबाहेरच रोखण्यात आली.
सोमवार हा एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा 15 वा दिवस होता. या 15 दिवसात कोणताच तोडगा न निघाल्याने, कोल्हापूर आगारातील कर्मचाऱयांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातंच आपला ठिय्या मांडला आहे. तोडगा न निघताच निलंबनाची कारवाई सुरू असल्याने, हे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. या संपातील कर्मचाऱयांनी कोणतीही बस बाहेर वा आत न सोडण्याचा निर्धार केला आहे. असे असताना सोमवारी दुपारनंतर पुण्याच्या स्वारगेट आगारातील तीन बसेस कोल्हापूरात दाखल झाल्या. यातून मोजकेच प्रवाशी कोल्हापूरात आले. प्रवाशी उतरताच पहील्या दोन बसेस मोकळया परत गेल्या. या दोन्ही बसेस दुपारी 2 व साडेतीन वाजता कोल्हापूरात आल्या होत्या.
यानंतर दुपारी साडे चार वाजता तिसरी शिवशाही बस कोल्हापूर आगारात आली. यावेळी संपामध्ये उपस्थित असलेले कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी ही बस आगाराबाहेरच रोखून चालक व वाहक यांना ही बस आहे तशी परत नेण्याची सूचना करून आगाराबाहेरच ही बस रोखण्यात आली.या परिसरामधील वातावरण तंग झाल्याने, एसटीचे अधिकारी व विविध पोलिस स्टेशनचे अधिकारी आपल्या फोजफाटयासह दाखल झाले. ही बस कोल्हापूरात आल्याने, आमच्या जखमेवर शासनाने मीठ चोळले आहे अशी भावना झाल्याने, हे कर्मचारी आक्रमक झाले. कोणताही अनुसूचीत प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांना ही बस बाहेरच परत पाठवल्याने कांही काळाने हे वातावरण निवळले.