क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसडीएम धारवाडने हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 99 धावानी, बीडीके ए संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ चा 5 गडय़ांनी, आनंद क्रिकेट अकादमीने सीसीके धारवाडचा 1 गडय़ाने तर एसडीएम ब संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 4 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. ज्ञानेश होनगेकर (आनंद अकादमी), शोएब मॅनेजर (बीडीके), परिक्षीत उकुंडी, इंद्रसेन दानी (एसडीएम धारवाड), आदर्श हिरेमठ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने 50 षटकात सर्व गडी बाद 260 धावा केल्या. शुभम नेसरीकरने 64, सुदीप सातेरीने 55, अमर घाळीने 43, आकाश कटांबळेने 29, ओमकार वेर्णेकरने 15 तर आदर्श माळीने 12 धावा केल्या. बीडीकेतर्फे साहील स्वद्धाने 44 धावात 4, हार्दिक ओझाने 34 धावात 2, फरहान पाटील, अनिल भुसद, शिषीर भवानी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके अ संघाने 42.5 षटकात 5 बाद 264 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. शोएब मॅनेजरने 111 धावा करून शतक झळकविले. शिषीर भवानी याने 71, साहील सौदाने 28, अनिस भूसदने 18 धावा केल्या. बीएससीतर्फे आकाश कटांबळे व पार्थ पाटील यांनी प्रत्येकी 56 धावात 2 तर राहुल वाजंत्रीने 1 गडी बाद केला.
बेळगाव केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सीसीके धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 43.3 षटकात सर्व गडी बाद 168 धावा केल्या. आदित्य शानभागने 37, अमर वेंगुर्लेकरने 32, सचिन रजपूतने 17, अक्षय हिरेमठने 16 तर राहुल वेर्णेकर, ध्रुव नायक यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. आनंदतर्फे आनंद कुंभारने 24 धावात 2, ज्ञानेश होनगेकरने 25 धावात 2, हर्ष पॅट्रॉट, अक्षय पाटील, तुषार चौगुले, विनोद देवाडिगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 37.1 षटकात 9 गडी बाद 169 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. ज्ञानेश होनगेकरने 41, तुषार चौगुलेने नाबाद 26, तर साहील पारिश्वाड व विनोद देवाडिगा यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. सीसीके धारवाडतर्फे ध्रुव नाईकने 48 धावात 3, अनिल गौडा पाटीलने 38 धावात 2 तर तेजस मुर्डेश्वर, अमर वेंगुर्लेकर, श्रीहरी माद्याळकर, अक्षय हिरेमठ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसडीएम धारवाड अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी बाद 369 धावा केल्या. त्यात परिक्षित उक्कुंडीने 143, इंद्रसेन दानीने 108 धावा करून शतके झळकविली. आजिम गुट्टण्णावरने 26, अमृत बी. बी. ने 42 धावा केल्या. हुबळी ब तर्फे साबल हावेरीने 73 धावात 4, सौरभ साळुंकेने 2 तर सुप्रित के. व माधवन धारवाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाने 46.5 षटकात सर्व गडी बाद 270 धावाच केल्या. नवीन संपकाळने 101, माधव धारवाडकरने 41, सागर एस. ए. ने 70 धावा केल्या. एसडीएमतर्फे राजु कलाल व इंद्रसेन दानी यांनी प्रत्येकी 3, हणमंत मांगलेने 2, आदित्य हिरेमठ, आदित्य पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
केजीजी हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसडीएम ब धारवाड संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 4 गडय़ानी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने 40.1 षटकात सर्व गडी बाद 241 धावा केल्या. त्यात अमित यादवने 93, धुव देसाईने 39, आकाश असलकरने 27, प्रशांत मुतगेकरने 20 धावा केल्या. एसडीएम ब तर्फे राघवेंद्रने 4, आदर्श हिरेमठने 3, दुष्यंतने 2, तर सुनिल कुरीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएम ब संघाने 38.1 षटकात 6 गडी बाद 242 धावा करून सामना 4 गडय़ानी जिंकला. आदर्श हिरेमठने 103, शिवाजी वड्डरने 38 तर प्रज्वल बी. व इम्रान खान यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब तर्फे विजयकुमार पाटीलने 3 प्रशांत मुतगेकर, आकाश असलकर व धुव देसाईने प्रत्येकी 1 गडी बाद केला.