प्रतिनिधी/ बेळगाव
एसपीएम रोडच्या एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले होते. आता दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. पण रस्त्यावर खडीचे ढिगारे आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. परिणामी हा रस्ता पुन्हा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. येथील कामे कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते कपिलेश्वर उड्डाण पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले होते. पण आतापर्यंत एकाच बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र हे काम व्यवस्थित झाले नाही. काँक्रीट रस्त्यावर ठिकठिकाणी चरी आहेत. गटारीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. दुसऱया बाजूच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्यापही रखडले आहे. अशातच रस्त्यावर ठिकठिकाणी खडी ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी गटारीचे बांधकाम आणि इतर कामे करण्यात येत असल्याने संपूर्ण रस्त्याची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे. महापालिकेने रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच डांबरीकरण केलेला रस्ता खराब झाला आहे. ठिकठिकाणी रस्ता खचला असून, पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना लहान-मोठे अपघात घडत आहेत. एका बाजूच्या रस्त्याचे काम अर्धवट आणि दुसऱया बाजूला खड्डे अशा परिस्थितीत वाहनचालकांना वाहने हाकावी लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे व नागरिकांचे जीव धोक्मयात आले आहेत. या रस्त्याचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत असून कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.