वृत्तसंस्था /मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून कार्यरत असणारी भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांनी आरोग्यम हेल्थकेअर बिजनेस कर्जाची नवी योजना सादर केली आहे. ही एक वेगळय़ा प्रकारची योजना आहे, जी कोरोनाच्या काळात आरोग्य क्षेत्रासाठी मदतीची ठरणारी असेल, असे एसबीआयने म्हटले आहे. बँकेकडून सादर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नवीन कर्ज कॅश क्रेडिट, टर्म कर्ज, बँक गॅरंटीसह लेटर ऑफ क्रेडिटच्या स्वरुपात घेता येणार आहे. या व्यतिरिक्त कमीत कमी 10 लाख रुपयांचे कर्ज मिळणार असून जास्तीत जास्त 100 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार असल्याचे संकेत आहेत. सदरचे कर्ज दहा वर्षांमध्ये फेडावे लागणार आहे. बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी देशात हेल्थकेअर क्षेत्राला मदत प्राप्त करुन देण्यासाठी नवीन योजना सादर केली आहे. सर्व हॉस्पिटल्स, नर्सिंगहोम, डायग्नॉस्टिक सेंटर्स, सप्लायर्सना नव्या योजनेत कर्ज घेता येणार आहे.