ऑनलाईन टीम / बीजिंग :
रशियाने 10 नोव्हेंबरला ‘एससीओ’ची ऑनलाईन शिखर परिषद आयोजित केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. चीनचे उपपराष्ट्रमंत्री ली युचेंग यांनी परिषदेबाबत माहिती दिली.
युचेंग म्हणाले, कोरोनानंतरच्या काळातील आव्हाने, सुरक्षा, स्थिरता आणि विकास यावर शी जिनपिंग ‘एससीओ’तील सदस्य देशांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. या ऑनलाईन परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हजेरी लावण्याची शक्यता आहे. पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून भारत-चीनमध्ये तणावाची परिस्थिती असताना ‘एससीओ’मध्ये सदस्य देशांचे हितसंबंध जपले जावेत, त्यांनी एकमेकांना सहकार्य करावे, सदस्य देशांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करू नये,’ असे मुद्दे जिनपिंग मांडणार आहेत.
दरम्यान, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ‘ब्रिक्स’ समूहाच्या ऑनलाईन परिषदेचेही आयोजन रशियाच करणार आहे.