प्रोफाईलवर सुंदर तरुणींच्या छायाचित्रांद्वारे गंडविण्याचा प्रकार, सायबर गुन्हेगारांचे आणखी एक जाळे उघड, बेळगाव परिसरातील अनेक तरुण मायाजालात
रमेश हिरेमठ /बेळगाव
जसा तंत्रज्ञानाचा विकास होत चालला आहे, तसे सायबर गुन्हेगारांचे कारनामेही वाढले आहेत. पूर्वी चोरी करण्यासाठी गुन्हेगाराला प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागायचे. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्याच्या बँक खात्यात शिरून त्या खात्यातील रक्कम हडप करण्याचे कसब गुन्हेगारांनी आत्मसात केले आहे. वाढती बेरोजगारीही सायबर गुन्हेगारांसाठी पैसा कमविण्याचा नवा मार्ग ठरत आहे.
आपल्यासारख्या बेरोजगार तरुणांना आकर्षक जाहिरातींच्या मोहजालात अडकवून त्यांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. यासाठी फेसबुकचा वापर करण्यात येत आहे. या टोळीच्या नादी लागून फशी पडलेल्या अनेक तरुणांनी न्यायासाठी सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली आहे. सायबर गुन्हेगारांनी अशी शक्कल लढविली आहे, की त्यांच्या जाळय़ात सावज अलगदपणे अडकते.
एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाने बेरोजगारांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी फेसबुकसह इतर समाजमाध्यमांचा वापर करण्यात येत आहे. नवी दिल्ली, नोयडा किंवा कोलकात्यात बसून बेळगाव येथील यंत्रणा हाताळली जाते. ‘रोज 12 ते 16 हजार रुपये कमवा’, अशी जाहिरातबाजी केली जाते. ‘आर्थिक फायद्याबरोबरच शरीरसुखही मिळवा’, अशी ही जाहिरात असते. नोकरीच प्ले-बॉयची! पूर्वी मुंबई, दिल्लीसारख्या महानगरीमध्ये असलेले प्ले-बॉय आणि एस्कॉर्ट गर्लची संस्कृती बेळगावातही फोफावू लागली आहे.
‘ज्याला विश्वास वाटतो, त्यांनीच आमच्याशी संपर्क साधा’, असे सांगत फेसबुकवर एक मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संस्थेचे नियम व अटी सांगितल्या जातात. एखाद्या राज्य किंवा केंद्र सरकारची नोकरी मिळवितानाही इतक्मया कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. आधारकार्डसह इतर प्रमाणपत्रे घेतली जातात. प्ले-बॉयच्या नोकरीसाठी ओळखपत्र दिले जाते. त्यांना सर्टिफिकेटही देण्याची क्यवस्था आहे.
आधारकार्डसह एखादे ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, अडीच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन त्यांची नोंदणी केली जाते. नंतर 25 ते 30 हजार रुपये ऑनलाईन भरून घेऊन ऍग्रीमेंट बॉण्ड केला जातो. संबंधितांना प्रमाणपत्रही दिले जाते. फेसबुकमधील सुंदर तरुणींचे फोटो पाहून प्ले-बॉय उतावीळ झालेला असतो. तो संबंधितांना संपर्क साधून सारखी विचारणा करीत असतो. ‘या आठवडाभरात तुम्हाला काम मिळणार आहे’ असे सांगत त्यांना झुलवत ठेवले जाते.
आमिष दाखवून आर्थिक फसवणूक
बेळगाव परिसरातील अनेक तरुण या टोळीच्या मायाजालात अडकून फसले आहेत. सायबर क्राईम विभागाकडे फसलेल्या तरुणांनी दाद मागितली आहे. ‘तुमच्याच शहरातील एखाद्या पुरुष किंवा महिलेला एकांतवासात तुमची गरज आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पाठविले जाईल’, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. मात्र, एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेला हा क्यभिचार रोखण्यासाठी सायबर क्राईम विभागही कार्यरत आहे.
बेरोजगारांना ठकविण्यासाठी जाळे
उपलब्ध माहितीनुसार बेळगावातील अनेकांनी 25 ते 30 हजार रु. भरून एस्कॉर्ट सर्व्हिसचे लायसन्स घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांना ‘काम’ मिळालेले नाही. अनामिका नावाने ओळखल्या जाणाऱया महिलेने बेळगाव परिसरात फेसबुकच्या माध्यमातून बेरोजगार, उद्योजक, धनिक यांना ठकविण्यासाठी जाळे टाकले असून प्रोफाईलवरील माहितीनुसार ती सांगलीची असल्याचे समजते. मात्र, सायबर क्राईम विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार अशा पद्धतीने फसविणारी टोळी दूरवरच्या राज्यातील आहे.
केवळ मोबाईलवरच संपर्क
बेळगाव परिसरातील अनेक जणांनी एस्कॉर्ट सर्व्हिस कंपनीचे सर्टिफिकेट व ओळखपत्र घेतले असले तरी आजवर प्रत्यक्षात कोणाचीच अनामिकाशी भेट झालेली नाही. केवळ मोबाईलवरच तिचा संपर्क असतो. सावजाला विश्वास पटावा म्हणून त्या त्या गावातील रस्ते, ठळक चौकांची नावे सांगत आपण या ठिकाणी आहोत. लवकरच तुम्हाला भेटणार आहोत, असे सांगून झुलवले जाते. एकदा त्यांच्या खात्यात ऑनलाईन पैसे जमा झाले की आपोआपच त्यांचा संपर्क कमी होतो. बेळगाव परिसरातील अनेक बेरोजगार तरुण या टोळीच्या नादी लागून फसल्याचे उघडकीस आले आहे.
एस्कॉर्ट सर्व्हिस मुळातच फसवेगिरी! : पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर
एस्कॉर्ट सर्व्हिसची नोकरी ही मुळातच फसवेगिरी आहे. पार्टटाईम नोकरी करा, पैसे कमवा आणि मजाही लुटा, अशी जाहिरातबाजी करत सावजाला जाळय़ात ओढणाऱया टोळय़ा परराज्यातील आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने सावजाला आपण तुमच्याच गावात आलो आहोत, असे भासवून गल्ल्यांची नावे, प्रमुख इमारतींची नावे सांगितली जातात. 25 ते 30 हजार भरणा करून घेऊन प्ले-बॉय एस्कॉर्ट सर्व्हिससाठी या बोगस कंपन्या ओळखपत्र देतात. अशा सायबर गुन्हेगारांच्या मोहलाजात तरुणांनी अडकू नये, असे आवाहन सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे. आपल्याकडे फसवणूक झाल्यानंतर अनेक तरुण न्याय मागण्यासाठी येतात. मुळात आपली फसवणूक होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. झटपट पैसा, व्यभिचाराच्या मार्गाने पैसा मिळविण्याच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, कारण एस्कॉर्ट सर्व्हिसची नोकरी ही मुळातच फसवेगिरी आहे, असे त्यांनी सांगितले.