वार्ताहर / कणकुंबी
कणकुंबी येथील श्री माउली विद्यालयाचे मुख्याध्यापक व कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे खानापूर तालुका अध्यक्ष एस. जी. चिगुळकर यांना नॅशनल रुरल डेव्हल्पमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हल्पमेंट यांच्यातर्फे देण्यात येणारा यावषीचा ‘आंतरराज्य शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील प्रत्येकी दहा शिक्षकांची निवड करण्यात आलेली असून विशेष शैक्षणिक व सामाजिक सेवा केलेल्या शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेडल, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा देऊन विशेष सत्कार केला जाणार आहे.
सदर आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे येत्या 28 मार्च रोजी होणार असून या फाऊंडेशनची स्थापना बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, ऍड. अनिल शिंदे, उद्योगपती सुरेशदादा पाटील व अभियंते मनोहर वड्डर यांनी केलेली आहे. पुरस्कार वितरण सोहळय़ाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिनेकलाकार, शिक्षण खात्यातील अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश उपस्थित राहणार आहेत.
कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी श्री माउली विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे सेवा बजावली आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याबरोबरच जांबोटी-कणकुंबी भागातील सामाजिक, सहकार आणि इतर क्षेत्रातील कार्यामुळे खानापूर तालुका महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी या नामांकित संस्थेचा पहिला गौरव पुरस्कारही मिळाला आहे.
आविष्कार फाऊंडेशन इंडिया यांच्यामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. कणकुंबी ग्राम पंचायतीने विद्या विकास रत्न हा विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच इतर विविध संघ-संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.