प्रतिनिधी/बेळगाव
एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे 83 वा गानसिंचन कार्यक्रम दि. 31 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पं. नरसिंहलु वडवटी यांचे शास्त्राrय क्लॅरिओनेट वादन होणार आहे.
पं. नरसिंहलु वडवटी यांचा जन्म 1942 झाला. त्यांचे आजोबा शहनाई वादक होते तर वडील तबलावादक. त्यांच्या आई उत्तम गायिका असल्यामुळे संगीताचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वेंकटप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच मातामरी विरण्णा हे त्यांचे पहिले गुरू होत. ग्वाल्हेर घराण्याचे गायक स्व. पं. सिद्धराम जंबलद्दिनी तर जयपूर घराण्याचे गुरु पंचाक्षर गवई यांच्याकडूनही त्यांनी तालीम घेतली. त्यांच्या बासरीवादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून ‘हू इज हू’ या जागतिक क्रमवारीत त्यांचे नाव आहे.
हाथी या त्यांच्या प्रेंच चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. कॅलीफोर्निया विद्यापीठाचे ते अतिथी प्राध्यापक आहेत. कर्नाटक संगीत नृत्य अकादमीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले आहे. आंतरराष्ट्रीय बासरी संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते. रायचूर येथे त्यांनी स्वरसंगम संगीत विद्यालय सुरू केले आहे.
या मैफलीला डंबळ गदगचे डॉ. सिद्धराम महास्वामीजी व रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामी उपस्थित राहणार आहेत.