प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यातील प्रवाशांसाठी एस टी महामंडळाकडून विविध सवलत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.असे आवाहन आगार व्यवस्थापक विद्या कदम यांनी केले आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थी पास वितरण सुरू आहे. यासाठी सागाव,कोकरूड, रेठरे धरण, न्यू इंग्लिश स्कूल शिराळा या ठिकाणी पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षक कर्मचारी व इतर कामगारांसाठी मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू आहे. त्याव्यतिरिक्त आवडेल तेथे प्रवास पास, सात आणि चार दिवसांसाठी उपलब्ध आहेत. ही सुविधा सध्या साध्या आणि निम आराम बससाठी उपलब्ध आहे.
शिवाय 65 वर्ष पूर्ण केलेल्या ,ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात चार हजार किलोमीटर पर्यंत 50 टक्के सवलत आहे. तर अंध , अपंगांसाठी 75 टक्के सवलत आहे.
अंधव्यक्ती सोबत येणाऱ्या व्यक्तीस आवश्यकतेनुसार 50 टक्केपर्यंत सवलत आहे. कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त प्रवानशांना 75 टक्केपर्यंत सवलत आहे. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी 100 % पासमध्ये सवलत आहे. या सर्व सुविधा एसटी महामंडळाकडून पूर्वी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.